वराड कुसरवे मार्गांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई : दुचाकी, मोबाईल जप्त ; गुन्हा दाखल
मालवण | प्रतिनिधी : मालवण कसाल मुख्य रस्त्यावरील वराड कुसरवे येथील तिठ्यावर गांजाची देवाण-घेवाण करताना चार जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण व मालवण पोलिसांच्या संयुक्त पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातील दोन दुचाकी, सहा मोबाईल व गांजा असा सुमारे १ लाख १७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे कर्मचारी विल्सन डिसोझा यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार संशयितांवर गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क)२० (ब) आयआयए नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, संशयीत संदीप विनायक परब वय 41 वर्ष राह. वराड मालवण, अविरत गणेश ढवण वय 31 वर्ष राह. हरकुळ ता. कणकवली, हेमंत अनिल भोगल वय 24 वर्ष राह. हरकुळ ता. कणकवली, आकाश शिवाजी निकम वय 24 वर्ष राह. कणकवली यांना मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी प्रत्येकी रक्कम रु. 15,000/- चा सशर्त जामीन मंजूर केला. संशयीतांतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, ॲड. अंबरीष गावडे व ॲड. हरेश्वर गरगटे यांनी काम पाहिले.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यांनी 31 जुलै रोजी वराड-कुसरवे येथे केलेल्या कारवाईत 262 ग्रॅम गांजासहीत संदीप विनायक परब वय 41 वर्ष राह. वराड मालवण, अविरत गणेश ढवण वय 31 वर्ष राह. हरकुळ ता. कणकवली, हेमंत अनिल भोगल वय 24 वर्ष राह. हरकुळ ता. कणकवली, आकाश शिवाजी निकम वय 24 वर्ष राह. कणकवली या संशयीतांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या विरोधात मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चारही संशयितांना मालवण पोलीसांनी अटक केली. संशयितांच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या. त्याप्रमाणे प्राथमिक तपासकाम करून पोलिसांनी संशयितांना मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपासाकरिता मालवण पोलिसानी सर्व संशयितांची 5 दिवसांच्या पोलिस कस्टडीची मागणी केली. संशयितांतर्फे केलेल्या युक्तीवादानुसार मालवण पोलिसांनी रिकव्हरी पूर्ण झाली असल्याने व प्राथमिक तपासकाम पूर्ण झाले असल्याच्या कारणास्तव पोलिसांची पोलीस कस्टडीची मागणी फेटाळून संशयीताना न्यायालयीन कोठडी मंजूर केली.
त्यानंतर संशयीतांतर्फे जामीनअर्ज दाखल करण्यात आले. जामीन अर्जाचे सुनावणीअंती मे. न्यायालयाने संशयितांना प्रत्येकी रक्कम रु. 15,000/- चा सशर्त जामीन मंजूर केला. अशी माहिती प्राप्त झाली आहे.













