हॉटेलच्या बाथरूममधून सोन्याची चेन चोरी; मुंबईतील नागरिकाची खेड पोलीस ठाण्यात तक्रार

खेड | प्रतिनिधी
खेड तालुक्यातील एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी आलेल्या मुंबईतील नागरिकाची 1.83 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद राजेश डेरीवाला (वय 44, रा. मालाड वेस्ट, मुंबई) हे 30 जुलै 2025 रोजी रात्री 10 वाजता त्यांच्या दोन एजंटसह खेडमधील एका हॉटेलमध्ये रूम नंबर 201 मध्ये थांबले होते. सकाळी आंघोळ करताना त्यांनी त्यांच्या गळ्यातील 14.06 ग्रॅम वजनाची, अंदाजे 1,83,340 रुपये किमतीची सोन्याची चेन बाथरूममधील वॉशबेसिनवर काढून ठेवली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी सुमारे 11 वाजता त्यांनी रूममधून चेकआउट केलं आणि रत्नागिरीकडे रवाना झाले. मात्र संगमेश्वर येथे पोहोचल्यावर त्यांच्या गळ्यात चेन नसल्याचे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तत्काळ संबंधित हॉटेलमध्ये संपर्क साधून रिसेप्शनिस्टला घटनेची माहिती दिली आणि चेनचा शोध घेण्याची विनंती केली. परंतु चेन मिळून आली नाही.

यानंतर 1 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 6.41 वाजता खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.