खेड ACCIDENT UPDATE : भरधाव डंपरची रिक्षाला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, रिक्षाचालक गंभीर जखमी

खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील भरणे-खेड मार्गावर भरधाव डंपरने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी 4 वा सुमारास घडला असून या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील भिलारे आयणी येथील संतोष भिलारे हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा (एमएच 08 एक्यू 8784) घेऊन भरणे येथून खेडच्या दिशेने जात होते. त्यांच्या रिक्षाने आठवडा बाजार परिसर गाठला असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की रिक्षाचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

या अपघातात रिक्षाचालक संतोष भिलारे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. मात्र मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून ती व्यक्ती रिक्षामध्ये प्रवास करत होती की रिक्षात बसण्यासाठी हात दाखवत असताना अपघाताची शिकार झाली, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या संदर्भात खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून जखमी रिक्षाचालकाला रुग्णालयात हलवले. तसेच 108 रुग्णवाहिका सेवा आणि खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या अपघाताचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.