७०० श्लोक मुखोद्गत केल्याबद्दल सन्मान
चिपळूण (प्रतिनिधी) : ‘गीता परिवार’ या नामवंत संस्थेमार्फत हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ समजल्या जाणाऱ्या श्रीमद् भगवद्गीता या ग्रंथातील श्लोकांचे पठण करण्याची अर्थात गीता पठण करण्याची ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेण्यात येते. या स्पर्धेच्या ५ परीक्षा उत्तीर्ण करून गीताव्रती हा सन्मान आर. सी. काळे माध्यमिक विद्यालय पेढे परशुराम येथील विद्यार्थिनी कुमारी भार्गवी शंकर कानडे हिने पटकावला आहे. श्रीमद् भगवद्गीता या ग्रंथातील संस्कृत भाषेतील १८ अध्याय म्हणजेच ७०० श्लोक भार्गवी कानडे हिने केले आहे. याच श्लोकांचे सादरीकरण तिने ऑनलाईन पद्धतीने सादर केले.
दोन वर्षांमध्ये तिने हे यश मिळवले आहे. या परीक्षेतील पाच टप्पे तिने यशस्वीपणे पूर्ण करून हे यश संपादन केले आहे. त्याबद्दल गीता परिवार या संस्थेच्या वतीने तिचा सन्मानपत्र व सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला आहे. या सन्मानाबद्दल तिचा आर. सी. काळे माध्यमिक विद्यालय पेढे परशुराम या शाळेमध्ये मुख्याध्यापक विनायक माळी यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुमारी भार्गवी कानडे ही तालुका व जिल्हास्तरावर अनेक वक्तृत्व, कथाकथन स्पर्धेतून यश मिळवणारी विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेच्या व संस्थेच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले आहे.













