सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून आजारी वृद्धाला जीवदान

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी बस स्थानकावर गेल्या दोन दिवसांपासून बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका वृद्ध व्यक्तीला ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ च्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात देत जीवदान दिले. पोलिसांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर प्रतिष्ठानच्या सदस्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

गेल्या दोन दिवसांपासून एक अज्ञात वृद्ध व्यक्ती सावंतवाडी बस स्थानकावर बेशुद्ध अवस्थेत होता. तो पूर्णपणे चिखलाने माखलेला होता आणि त्याच्या कपड्यांची अवस्थाही खराब झाली होती. पोलीस कर्मचारी धोत्रे आणि कांबळी यांनी ही माहिती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांना दिली. माहिती मिळताच रवी जाधव आणि रूपा गौंडर (मुद्राळे) यांनी तात्काळ बस स्थानक गाठले.


त्यांनी त्या वृद्धाला गरम पाण्याने अंघोळ घालून स्वच्छ केले आणि नंतर त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या मदतीमुळे त्या वृद्धाला वेळेत उपचार मिळाले आणि त्याचा जीव वाचला. या मानवतावादी कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यासाठी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा गौंडर (मुद्राळे), गौरव रजपूत, विशाल नाईक आणि नितेश वरक यांनी विशेष सहकार्य केले.