हेड कॉन्स्टेबल अमित राऊळ ठरले खाकी वर्दीतील देवदूत

समयसूचकता दाखवत खांद्यावरून उचलून नेत वाचवले रुग्णाचे प्राण

सावंतवाडी । प्रतिनिधी : माणुसकी हरवत चालल्याची ओरड सर्वत्र होत असतानाच, पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने दाखवलेल्या असामान्य धाडसाने आणि माणुसकीच्या उदाहरणाने समाजाला एक प्रेरणादायी संदेश दिला आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी अमित राऊळ यांनी अपघातात जखमी झालेल्या एका वृद्धाला वेळेवर मदत मिळवून देण्यासाठी स्वतःच्या खांद्यावर उचलून घेत धावतच रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या कृतीमुळे केवळ एका व्यक्तीचे प्राणच वाचले नाहीत, तर समाजाप्रती असलेल्या कर्तव्याचे एक उज्ज्वल उदाहरणही समोर आले आहे.

ही हृदयस्पर्शी घटना काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास येथील तीन मुशी परिसरात घडली. घावनळे येथील रहिवासी बाळा राऊळ (वय ६५) हे त्यांच्या लुना गाडीवरून जात असताना एका भरधाव दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेने बाळा राऊळ हे गाडीसह रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात कोसळले आणि त्यांचा पाय गंभीर जखमी झाला.

अपघाताच्या या घटनेने परिसरातील लोक मदतीसाठी धावले खरे, परंतु कोणीही त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आपली गाडी थांबवली नाही. तातडीने १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन करण्यात आला, मात्र सुमारे पंधरा मिनिटे उलटूनही रुग्णवाहिका पोहोचली नाही. हा सर्व प्रकार जवळून पाहणारे कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी अमित राऊळ यांनी कोणताही विलंब न करता पुढाकार घेतला. त्यांनी क्षणाचाही विचार न करता जखमी बाळा राऊळ यांना दोन्ही हातांनी उचलून घेतले आणि धावत धावत थेट रुग्णालयाकडे धाव घेतली.

अमित राऊळ यांचे हे धाडस आणि समयसूचकता पाहून रुग्णालयातील डॉक्टर आणि बाळा राऊळ यांच्या नातेवाईकांनी त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात, दुसऱ्याच्या मदतीसाठी स्वतःला झोकून देणाऱ्या अमित राऊळ यांच्यासारख्या व्यक्तींमुळेच माणुसकी अजूनही जिवंत आहे, याची प्रचिती येते. त्यांची ही कृती केवळ कर्तव्यपूर्ती नसून, माणुसकीचे आणि सामाजिक जबाबदारीचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे.