शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष
मालवण | प्रतिनिधी : बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांसाठी काही ग्रामसेवकांकडून बांधकाम कामगारांना वेठीस धरण्याचे प्रकार होत आहेत. ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांना सहकार्याची भूमीका ठेवून नोंदणी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात मदत करावी. अशी भुमिका शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मांडली.
आमदार नीलेश राणे यांनी बांधकाम कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष घातले आहे. बांधकाम कामगारांना असहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल थेट तक्रार आमदारांकडे आल्या आहेत. यामुळे बांधकाम कामगारांना आपल्या कार्यालयाकडून सहकार्य व्हावे. असेही श्री. सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी उदय पाटील यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करण्यात येईल असे स्पष्ट केले.
मालवण पंचायत समिती याठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी उदय पाटील यांची दत्ता सामंत यांनी भेट घेत तालुक्यातील काही ग्रामसेवकांकडून करण्यात येत असलेल्या असहकार्याच्या भूमीकेबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यावेळी शहरप्रमुख दिपक पाटकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष शाम वाक्कर, अरूण तोडणकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शासनाकडून बांधकाम कामगारांना काही प्रमाणात साहित्य देण्यात येत असते. तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही मदत केली जात आहे. त्यांना आरोग्य विषयक अनेक योजनाही यामुळे मिळत आहेत. यासाठी बांधकाम कामगारांची नोंदणी आवश्यक असते. यामुळे ग्रामसेवकांनी त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारीतून त्यांना सहकार्य करत त्यांची प्रकरणे तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहेत. बांधकाम फेऱ्या माराव्या लागता नये. आम्ही आजपर्यंत कधीही ग्रामसेवकांच्या कामकाजाबद्दल बोललेलो नाही, आता बांधकाम कामगारांच्या हिताचा प्रश्न असल्याने आम्ही आलो आहोत.
गावागावात शिबीर घेणार
बांधकाम कामगारांच्या प्रकरणांसाठी आता शिवसेनेच्यावतीने प्रत्येक गावात शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. बांधकाम कामगारांचे प्रस्ताव एका दिवसात घेऊन तातडीने ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सहकार्य करणार आहोत. त्यामुळे यापुढे एकाही कामगाराचा प्रस्ताव अडकून राहता कामा नये, अशाप्रकारच्या सूचना सर्व ग्रामसेवकांना देण्यात याव्यात. असेही सामंत यांनी सांगितले.













