वाढत्या चोरीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत नाकाबंदी 

वाहनांची तपासणी करूनच पुढे वाहने मार्गस्थ 

कणकवली – मुंबई – गोवा महामार्गावर जाणवली गडनदी पुलावर तालुक्यात वाढत्या चोरीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी करण्यासाठी व वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी, विनापरवाना वाहन चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट वापरणे, वाहनासादर्भात असलेली कागदपत्रे अपूर्ण, ड्रिंक अँड ड्राईव्ह करणे, ट्रिपल सिट वाहन चालवणे अशा विविध कारणास्तव कणकवली पोलीसांचे पथक नाकाबंदीसाठी तैनात करण्यात आले आहे.

 

जिल्हा पोलीस अधिक्षक मोहन दहिकर , उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढावा, पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी केली जात आहे.

 

या तपासणी पथकात पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळी, महिला पोलीस प्रणाली जाधव, वाहतूक पोलीस दिलीप पाटील, कॉन्स्टेबल दिग्विजय काशीद, हवालदार दीपक चव्हाण आदी या कारवाईत सहभागी झाले होते.

 

या कारवाईने मात्र अनेक वाहन चालकांचे धाबे दणाणले होते. मात्र जिल्ह्यात ओसरगाव टोल नाका, खारेपाटण चेक नाका, फोंडा चेकनाका, वैभववाडी चेकनाका असताना थेट वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या मार्गावरच तसेच उतार भागावर तपासणी पथक थांबल्यानं हायवेवर वेगाने वाहनचालकांना वाहनांवर नियंत्रण मिळवणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनचालकांमधून तीव्र नाराजी देखील व्यक्त केली जात आहे