रत्नागिरी| प्रतिनिधी :
रत्नागिरी जिल्ह्यात 8 ऑगस्ट 2025 रोजी नारळी पौर्णिमेनिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी हा निर्णय घेतला असून, तो जिल्हा महसूल हद्दीतील सर्व शासकीय कार्यालयांना लागू असेल.
शासनाने दरवर्षी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त, जिल्हाधिकाऱ्यांना तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकार असतात. याच अधिकाराचा वापर करत जिल्हाधिकाऱ्यांनी खालील तीन स्थानिक सुट्ट्या निश्चित केल्या आहेत:
8 ऑगस्ट – नारळी पौर्णिमा
2 सप्टेंबर – ज्येष्ठा गौरी विसर्जन
20 ऑक्टोबर – नरक चतुर्दशी (अभ्यंगस्नान)
या स्थानिक सुट्ट्यांची अधिसूचना 7 मार्च 2025 रोजीच जारी करण्यात आली होती.
नागरिकांनी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी याचा विचार करून आपली कामे नियोजित करावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.











