१५ ऑगस्टला अमरण उपोषणाचा इशारा
खेड (प्रतिनिधी) |
खेड शहरातील ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्वाचे असलेले गरम पाण्याचे कुंड गेल्या आठ ते दहा वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. मागील वर्षी महाराजा प्रतिष्ठान आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नातून या कुंडांची स्वच्छता व दुरुस्ती करून ती पुन्हा लोकांसाठी खुली करण्यात आली होती. मात्र, खेड नगरपरिषदेच्या उदासीनतेमुळे यावर्षी पुन्हा ही कुंड पूर्वीप्रमाणेच दुर्लक्षित व अस्वच्छ अवस्थेत आहेत.
खेड नगरपरिषद प्रशासनाने याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असा आरोप करण्यात आला आहे. या कुंडांचे जतन करणे आणि त्यांची स्वच्छता करणे ही नगरपरिषदेची जबाबदारी असूनही ती बजावण्यात अपयश आल्याने स्थानिक जनतेत नाराजीचा सूर आहे.

या पार्श्वभूमीवर महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आले असून, येत्या १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत गरम पाण्याची कुंड स्वच्छ करून सुसज्ज अवस्थेत न केल्यास १५ ऑगस्ट २०२५ रोजी तहसील कार्यालय, खेड येथे अमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनप्रसंगी दुर्ग सेवक व महाराजा प्रतिष्ठानचे सचिव प्रणव मापुस्कर, मार्गदर्शक निखिल जामसंडेकर, किरण तायडे, स्वराज गांधी, नरेंद्र जाधव, अभिजीत मुंडेकर आणि आर्यन मापुस्कर आदी उपस्थित होते.
स्थानिक प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन ही कुंड जनतेसाठी पुन्हा उपलब्ध करून द्यावीत, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.











