रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनच्यावतीने २३ आणि २४ ऑगस्ट या कालावधीत जिल्हा ज्युनिअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा डेरवण क्रीडा संकुलात होणार असून, या स्पर्धेतून राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड केली जाणार आहे.
३९ वी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २ ते ५ सप्टेंबर २०२५ या काळात पुणे येथे होणार आहे. त्याकरिता जिल्ह्यातील १४, १६, १८, २० आणि २३ वर्षाखालील मुले व मुली या गटांतील खेळाडूंची निवड केली जाईल.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी २१ ऑगस्टपूर्वी ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. १२ वर्षाखालील खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. एका खेळाडूला त्याच्या वयोगटात फक्त दोन क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेता येईल. पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकाच्या खेळाडूंची राज्य स्पर्धेकरिता निवड केली जाईल. यासाठी १०० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाईल.
अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव संदीप तावडे यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळा कदम आणि उपाध्यक्ष श्रीकांत पराडकर यांनी जास्तीत जास्त खेळाडूंनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.












