चिपळूण : जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा योगासन चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा नांदिवसे नंबर एक या शाळेचा अंश उमेश शिंदे याने बॅकवर्ड बेंड या योगा प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल चे अध्यक्ष बिपिन दादा पाटणे यांच्या हस्ते त्यांला प्रमाण पत्र प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात छत्रपती पुरस्कार प्राप्त पहिली योगा पट्टू पूर्वा किनरे तिचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेमध्ये जवळजवळ दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा नांदिवसे नं १ या अतिशय दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आठ विद्यार्थ्यांनी योगासनाच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये सहभाग घेतला होता.
यामध्ये दिया विजय जोशी, मंजिरी मंगेश गोरिविले, आरोही विनायक, जोशी रावी, रमेश बुरटे, सिद्धी सचिन पडयाळ, विघ्नेश विजय जोशी या विद्यार्थ्यांनी ट्रॅडिशनल योगा या प्रकारात सहभाग घेतला होता .तर ओंकार बाबू झोरे याने सुपाईन व अंश उमेश शिंदे बॅकवर्ड बेंड या योगासन प्रकारात सहभाग घेतला होता.
या शाळेतील राज्यस्तरीय योगापंच संतोष दत्ताराम जाधव हे विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन करीत आहेत. गेली दहा वर्षे ते या क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी कार्य करीत आहेत. या विद्यार्थ्यांचे गटशिक्षण अधिकारी शेंडगे, विस्तार अधिकारी सौ. वरवी जाधव, केंद्रीय प्रमुख भगवान मोरे, मुख्याध्यापक श्याम सुंदर भुरण ,रवींद्र आदवडे, व्यवस्थापन समिती अध्यक्षा वैष्णवी जोशी, उपाध्यक्ष श्रावणी देवरुखकर यांनी अभिनंदन केले आहे.












