मुलांच्या शिक्षणासोबतच सर्वांगीण विकासासाठी पालकांनी प्रयत्न करावेत : सुभाषराव चव्हाण

चिपळूण तालुका मराठा संघातर्फे विद्यार्थी गुण गौरव सोहोळा

चिपळूण (प्रतिनिधी):- पालकांनी मुलांच्या शिक्षणासोबतच सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. सध्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा अतिवापर असून तो पुढील काळात धोकादायक ठरू शकतो. विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, मेहनत घेतली तर प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करणे सोपे जाईल, असे प्रतिपादन चिपळूण तालुका मराठा संघ अध्यक्ष तथा चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी केले.

 

चिपळूण तालुका मराठा संघ यांच्या वतीने नुकताच शहरातील बहाद्दूरशेख नाका येथील सहकार भवन येथे समाजातील दहावी, बारावी, पदवीधर उच्च पदवीधर आणि अभियांत्रिकी क्षेत्रात उज्वल यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सन्मान गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुभाषराव चव्हाण बोलत होते. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थी आणि पालक यांनी यावेळी भाषणातून मनोगत व्यक्त करीत

चिपळूण तालुका मराठा संघाचे आभार मानले.

 

यावेळी चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा चिपळूण तालुका मराठा संघाचे अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, कार्याध्यक्ष अशोक साबळे,महिला संघटक सौ.स्मिता चव्हाण, उपाध्यक्ष दौलत शिंदे, उपाध्यक्ष प्रशांत यादव, उपाध्यक्षा अॅड. सौ. नयना उदय पवार, खजिनदार शशिकांत कदम, उपखजिनदार उदय विचारे, सरचिटणीस महेंद्र खेतले, सहचिटणीस रमण डांगे, सहचिटणीस वैभव चव्हाण, सहचिटणीस विलास सावंत, सदस्य सुर्यकांत खेतले, गुलाब सुर्वे, सल्लागार, सत्यवान म्हामुणकर, शांताराम सुर्वे, अशोक कदम, उदय पवार, शिवसेना उबाठा चिपळूण तालुकाप्रमुख बळीराम गुजर, सखाराम पवार, सुरेश साळवी, प्रकाश भोसले, सौ.गिता शिंदे आदी उपस्थित होते.

 

यावेळी चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी सौ. स्वप्ना यादव यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचली पाहिजेत. जीवनात खरे ज्ञान पुस्तकातूनच मिळते. चिपळूण नागरीच्या माध्यमातून सहकार प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. या धर्तीवर विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर घेण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही सौ. यादव यांनी यावेळी दिली.

 

 

चिपळूण नागरीच्या संचालिका ऍड. नयना पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत. तरच शैक्षणिक काळात ते अभ्यासाकडे लक्ष देतील, असे सौ. पवार यांनी सांगितले. याचबरोबर विनायक जाधव, सावी पवार, प्रमोद चव्हाण, गीता शिंदे, सचिन देसाई, सायली जाधव यांनी यावेळी भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले.

 

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी चिपळूण नागरीचे अविनाश गुडेकर, प्रशांत वाजे, संदीप पाटील, गणेश कदम आदी उपस्थित होते.