कळसवलीत घरफोडी; पितळी-तांब्याची भांडी लंपास

राजापूर : प्रतिनिधी
कळसवली (ता. राजापूर) येथे घरफोडी करून पितळी व तांब्याच्या भांड्यांसह सुमारे 8 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जून 2025 ते 5 ऑगस्ट 2025 या कालावधीत सकाळी 9.16 वाजता, नंदिनी भास्कर बागाव (वय 66, मूळ कळसवली, सध्या गिरगाव) यांच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने त्यांच्या श्रीकृपा बंगल्याच्या दरवाज्याची ग्रॅनाईट चौकट उचकटून तोडण्यात आली. त्यानंतर देवघरातील कपाट व किचनमधून पितळी-तांब्याच्या धातूची भांडी चोरून नेण्यात आली.

चोरी गेलेल्या मुद्देमालामध्ये पितळी व तांब्याचे तबेले, परात, हंडा, कळशी आणि धातूचे निरंजन यांचा समावेश आहे. या भांड्यांची एकूण किंमत 8 हजार 700 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी 7 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3.55 वाजता राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू आहे.