खेड प्रतिनिधी – गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्यावरून खेड तालुका शिवसेना प्रमुख सचिन धाडवे यांनी त्यांना थेट आणि तीव्र शब्दांत इशारा दिला आहे.
रामदास कदम आणि योगेश कदम यांच्यावर सातत्याने टीका करून उद्धव ठाकरे आपली दखल घेतील आणि आपण विरोधी पक्षनेता व्हाल, अशी भास्कर जाधव यांची धडपड कधीच पूर्ण होणार नाही, असा टोला धाडवे यांनी लगावला. “कारण महाराष्ट्रात आता विरोधी पक्षच शिल्लक नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
धाडवे म्हणाले, “रामदास भाईंच्या नखाची तरी सर भास्कर जाधव यांना येईल का? भाईंनी महाराष्ट्रासाठी केलेली कामे सर्वांनी पाहिली आहेत. शिवसेना नेते म्हणून भाईंनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात फिरून कार्यकर्त्यांना बळ दिले, अनेक कुटुंबांना आधार दिला. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठीही त्यांनी मोठे प्रयत्न केले. भास्कर जाधव, तुम्ही स्वतःच्या दोन मुलांना व्यवस्थित उभे केले का? भाईंची दोन्ही मुले समाजकारण व राजकारणात सक्षम आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. तुमच्या मुलांची स्थिती पाहून स्वतःचे परीक्षण करा.”
यावेळी त्यांनी वैयक्तिक टीकाही केली. राजकीय पातळीवर टीका करताना धाडवे म्हणाले, “गुहागरचे सर्व जिल्हा परिषद माजी सदस्य शिवसेनेत प्रवेश करत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट संपत चालला आहे. भविष्यात भास्कर जाधव यांचे नामोनिशाणही उरणार नाही. गुहागर मतदारसंघातून निवडणूक लढवल्यास तुमचे डिपॉझिटही वाचणार नाही. त्यामुळे बोलताना भान ठेवा. आमच्या नेत्यांवर केलेली मर्यादेबाहेरची टीका सहन केली जाणार नाही. राजकारणात एकमेकांवर टीका-टिप्पणी होतातच, पण त्यालाही काही मर्यादा असतात.”
शेवटी धाडवे यांनी इशारा देत म्हटले, “तुम्ही एक चांगले नकलाकार आहात, पण नकला किती आणि कशा कराव्या याचा अभ्यास करा. अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांनंतर तुमची परिस्थिती काय होईल, हे तुम्ही स्वतःच पाहाल.”








