दापोली, 9 ऑगस्ट 2025: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हवामानावर आधारित कृषी सल्ला देण्यात आला आहे. यानुसार, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात वादळासह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच, 12 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 10 आणि 11 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कृषी सल्ला:
* भात पीक:
* भात खाचरातील बांधांची दुरुस्ती करावी आणि बांध तणमुक्त ठेवावेत, जेणेकरून पिकांना पाण्याची कमतरता भासणार नाही.
* भात पुनर्लागवडीनंतर 30 दिवसांपर्यंत शेतात 2.5 ते 5 सेमी पाण्याची पातळी राखावी आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
* ढगाळ वातावरणामुळे भात पिकावर सुरळीतील अळी आणि निळे भुंगेरे यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
* सुरळीतील अळीच्या नियंत्रणासाठी, शेतात पाणी साठवून ठेवावे आणि नंतर जाड दोरीने पिकावरून ओढत न्यावे, जेणेकरून अळ्या पाण्यात पडतील.
* निळ्या भुंग्यांच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस 25 टक्के 2000 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रिन 5 टक्के 250 मिली प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
* खेकड्यांच्या नियंत्रणासाठी, पावसाच्या सुरुवातीला सलग 2-3 रात्री खेकडे पकडावेत किंवा विषारी आमिषाचा वापर करावा.
* नागली आणि वरी:
* नागलीची पुनर्लागवड 30 दिवसांची रोपे वापरून दोन रोपात 15 सेमी आणि दोन ओळीत 20 सेमी अंतर ठेवून करावी.
* नागलीसाठी हेक्टरी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे.
* लावणीनंतर 2-3 आठवड्यांनी तण काढणी करावी.
* नारळ:
* वाढलेल्या आर्द्रतेमुळे नारळावर कोंब कुजणे या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
* नियंत्रणासाठी, कुजलेला कोंब साफ करून 1% बोर्डोमिश्रण टाकावे आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 1% बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.
* आंबा:
* आंबा पिकाला पॅक्लोब्युट्रॉझॉलची मात्रा पावसाची उघडीप पाहून किंवा तीव्रता कमी असताना द्यावी.
* झाडाच्या पूर्व-पश्चिम व दक्षिण-उत्तर व्यासाची सरासरी काढून, प्रति मीटर व्यासासाठी 0.75 ग्रॅम पॅक्लोब्युट्रॉझॉल द्यावे.
* काजू:
* काजूच्या कलमांना चौथ्या वर्षापासून, प्रति झाड 4 घमेली शेणखत, 2 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ऑगस्ट महिन्यात द्यावे.
* हळद:
* हळदीला नत्र खताची पहिली मात्रा 850 ग्रॅम युरिया प्रति गुंठा, लागवडीनंतर दीड महिन्यांनी पावसाची तीव्रता कमी असताना द्यावी.
* पशुपालन:
* वादळासह विजांचा कडकडाट होत असताना जनावरे झाडाखाली बांधू नयेत, त्यांना सुरक्षित गोठ्यात बांधावे.
अधिक माहितीसाठी शेतकरी जवळच्या कृषी विद्यापीठाचे केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकतात.










