विसापूर येथून बेपत्ता झालेल्या भरत भेलेकर याला शोधण्यात यश

दापोली l प्रतिनिधी :  तालुक्यामधील विसापूर येथून बेपत्ता झालेल्या भरत भेलेकर याला शोधण्यात दापोली पोलिसांना यश आले आहे. दि. २ जुलै रोजी विसापूर येथून भरत भेलेकर वय ३४ हा दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास त्याचा चुलत भाऊ सहदेव भेलेकर यांच्याबरोबर दुकानात जातो असे सांगून गेला होता. तो घरी परत न आल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार पांडुरंग भेलेकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली होती.

 

दि. ३ जुलै रोजी भरत याची

पत्नी सुगंधा व तिच्यासोबत ७ वर्षाचा आराध्य व ४ वर्षाचा श्री अशा दोन मुलांना घेऊन त्यांना शाळेत सोडण्याकरिता घराबाहेर पडली ती परतली नव्हती. म्हणून मुलांच्या अपहरणाचा तर सुगंधा ही बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. एकाच कुटुंबातून चौघेजण बेपत्ता झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली होती. त्यानंतर सुगंधा भेलेकर व तिच्या २ मुलांना शोधून काढण्यात दापोली पोलिसांना यश आले होते.

 

दापोली पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल श्री. विकास पवार यांना भरत भेलेकर हे दापोली तालुक्यातील कुंभवे या गावात असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तेथे जावून त्यांना दापोली पोलीस ठाण्यात आणले तेथे यांचा जबाब घेवून त्यांना घरी सोडण्यात आले. यामुळे कुटुंबातील चारही जणांना दापोली पोलिसांनी शोधून काढले आहे..