▪️वडाचापाट येथे शाश्वत शेती दिनानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
मसुरे | झुंजार पेडणेकर
राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत अन्नधान्य, पिके, सन 2025-26 तसेच तालुका कृषी अधिकारी मालवण कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. एम एस स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त शाश्वत शेती संदर्भात विविध विषयांवर मार्गदर्शन ग्रामपंचायत वडाचापाट येथे आयोजित करण्यात आले.
यावेळी वडाचापाट सरपंच सोनिया प्रभुदेसाई, उपसरपंच सचिन पाताडे, माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई, ग्राप सदस्या सविता पालव, सोनल मांजरेकर, तालुका कृषी अधिकारी मालवण अमोल करंदीकर, पोईप मंडळ कृषी डी.के.सावंत, उप कृषी अधिकारी पोईप एस एस चव्हाण, कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ विकास धामापूरकर, वडाचापाट कृषी सेवक के.पी. डोईवाड, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश गोसावी, सहाय्यक कृषी अधिकारी अमृता भोगले, स्नेहल जीकमडे, दयानंद प्रभूदेसाई, वैभव मळगावकर, पोलीस पाटील विजय पालव, मिलिंद कदम, नितेश पाताडे, राहुल इंगोले, व वडाचापाट येथील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर म्हणाले, राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी विषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याबाबत शेतकऱ्यांना शेतीच्या विविध पद्धती व शाश्वत शेती प्रकाराबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती बरोबरच आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या शेतीचा दर्जा वाढवावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या कृषीविषयक योजनांची उपस्थित शेतकऱ्यांना विस्तृत माहिती देऊन मार्गदर्शन केले.
कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ विकास धामापुरकर यांनी नाचणी व वरी लागवड तंत्रज्ञान विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे सध्या शेतकरी शेती करण्याचे धाडस करत नसून याबाबत शासन स्तरावरून उपाययोजना व कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. प्रामुख्याने मालवण तालुक्यात सध्या गवारेडे, माकडे, तसेच अन्य वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव्य वाढला असून यामुळे शेती केल्यास शेतीची राखण कशी करावी यावी वंचनेत शेतकरी सापडले आहेत. उपस्थित कृषी अधिकार्यांनी शेतकऱ्यांची ही मोठी समस्या शासनापर्यंत पोचवून शेतकऱ्यांना उपाय योजनेबाबत मार्गदर्शन व कार्यवाही करावी असे आवाहन शेतकऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक डि.के सावंत यांनी तर सूत्रसंचालन व आभार के.पी डोईवाड यांनी मानले.












