आमदार निरंजन डावखरे यांनी वेधले लक्ष
जैतापूर (वार्ताहर): अकरावी प्रवेश प्रक्रियेत सुरू असलेल्या सावळा गोंधळी कारभारचा फटका अनेक प्रवेश पात्र विद्यार्थांना बसला असून आहे. याबाबबत विधान परिषदेचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे यांचे लक्ष वेधले असून याची तात्काळ दखल घेत या प्रकरणी तात्काळ उचित कार्यवाही करावी असे आदेश ना. भुसे यांनी आयुक्त शिक्षण विभाग पुणे यांना दिले आहेत. तशी माहिती आ. डावखरे यांनी दिली आहे.
या संदर्भात रत्नागिरीचे सामाजिक कार्यकर्ते राजू भाटलेकर यांनी ही बाब अॅड. डावखरे यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
पहिल्या चार कॅप राऊंडमध्येच जास्त गुणधारक अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. यामागे ऑनलाइन फॉर्म अनलॉक व लॉक करण्याविषयीची अज्ञानता, वारंवार बदलणारे नियम आणि वेळेत सुधारणा न होणे, हे मोठे कारण असल्याचे समोर आले आहे. परिणामी, त्यांची नावे “ओपन टू ऑल” याद्यांमध्ये समाविष्टच झाली नाहीत. दरम्यान, 11 ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू होत असल्याने इच्छित शाखा व आवडीचे महाविद्यालय मिळेल की नाही याबाबत भिती निर्माण झाली आहे.
दरम्यान या प्रश्नी विधान परिषदेचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे यांची भेट घेऊन त्यांचे या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले आहे. ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित आहेत. तिसऱ्या व चौथ्या फेरीत रत्नागिरीतील नामांकित महाविद्यालयात जागा असूनही, ओपन कॅटेगरीतील एकाही विद्यार्थ्याचे नाव यादीत आले नाही. सायन्स शाखेत तिसऱ्या फेरीअखेर १८९ जागा रिक्त असून, चौथ्या फेरीत फक्त ३ विद्यार्थ्यांची नावे जाहीर झाली. कॉमर्स शाखेतही जागा असतानाही प्रवेश यादी योग्य पद्धतीने तयार करण्यात आली नाही. याशिवाय, पाचव्या ‘ओपन टू ऑल’ फेरीत कमी टक्केवारीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, तर गुणवंत विद्यार्थी तांत्रिक त्रुटींमुळे बाहेर राहिले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये भीती आणि संभ्रम कायम असून मानसिक तणाव वाढला आहे. या बाबी आ. डावखरे यांनी निदर्शनास आणून देत याबाबत तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. शिक्षणमंत्र्यांना तातडीने याची चौकशी करून तांत्रिक अडचणी दूर करण्याची, आवश्यक सुधारणा करण्याची आणि सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याची मागणी त्यानी केली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आयुक्त, शिक्षण विभाग यांना तात्काळ चौकशी करून उचित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.












