नारळ – सुपारी फळगळतीचे पंचनामे करा

अनेक मागण्यांसह शेतकऱ्यांनी घेतली जिल्हा कृषी उपसंचालकांची भेट

बांदा : प्रतिनिधी

यंदा झालेल्या अतिवृष्टी व अति ओलाव्यामुळे नारळ व सुपारी यांची प्रचंड प्रमाणात प्रमाणात फळगळती झाली आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे. नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान भरपाईचा परिस्थितीजन्य सकारात्मक अहवाल शासनाकडे पाठवण्यात यावा व इतर मागण्यांसाठी बांदा दशक्रोशीतील शेतकऱ्यांनी भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर यांच्या नेतृत्वात जिल्हा कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बढे यांची भेट घेत शेती विषयक इतर अनेक समस्या देखील मांडल्या.

यावेळी घाटमाथ्यावरील हवामान, जमीन, पाऊस, जमिनीचे क्षेत्र यामध्ये व कोकणातील परिस्थिती यामध्ये प्रचंड तफावत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कोकणातील आंबा, काजू, कोकम, नारळ, सुपारी अशा फळ पिकांसाठी स्वतंत्र अनुरूप विकास आराखडा तयार करण्यात यावा, अशी मागणी केली. तसेच कोकणातील शेतीपूरक अनेक अवजारे अद्याप पर्यंत अनुदानित करण्यात आलेली नसल्याचे देखील यावेळी शेतकऱ्यांनी उपसंचालक यांच्या निदर्शनास आणून दिले.

तसेच भेडल्या माडाची पाने चोरट्या पद्धतीने शहराच्या ठिकाणी केवळ सजावटीसाठी पाठवण्यात येत असल्याने शेकरू सारख्या राज्य प्राण्याचे रहिवासाचे ठिकाण धोक्यात आल्याने त्यांच्याकडून नारळ बागायतीचे प्रचंड नुकसान करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. शेततळ्याच्या आवरणाच्या प्लास्टिकचा दर्जा देखील ५०० मायक्रोन ठेवावा अशी मागणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांबाबत उपसंचालक व संबंधित अधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हा कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बढे यांनी शेतकऱ्यांच्या सर्व समस्या समजून घेत चर्चा केली. शेतकऱ्यांनी सुचवलेली सर्व अवजारे अनुदान अंतर्गत उपलब्ध करून दिली जातील. कोकण विभागाकरीता कृषी विषयक नवीन योजनांचा आराखडा लवकरच तयार करणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी सुचवलेली सर्व अवजारांची नोंद घेत ती अवजारे या आराखड्यात अनुदानाखाली उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी करता येत्या आठ दिवसात प्रत्यक्ष पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश देणार असल्याचे सांगितले.

शेततळ्याचे आवरणाच्या प्लास्टिकचा दर्जा ५०० मायक्रोन ठेवला जाईल. तसेच भेडल्या माडांच्या व शेकरू तसेच अन्य जंगली प्राण्यांच्या समस्येबाबत वनविभागाला सूचित केले जाईल, असे स्पष्ट केले.

यावेळी भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, जयेश सावंत, शरद सावंत, चंद्रकांत भिसे, आनंद वसकर, दिनेश देसाई, राजेंद्र सावंत,नारायण प्रभू शिरोडकर, सौरभ सिद्धये, डॅनी अल्मेडा यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.