साईप्रसाद कल्याणकर यांची मागणी
बांदा l प्रतिनिधी :गणेशोत्सवाच्या काळात गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या अवजड वाहनांवर बंदी घालण्यात यावी. तोरसे – दुसगी येथे सदर वाहने थांबवावीत. अन्यथा गोव्यातून येणारी अवजड वाहने गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करताना पत्रादेवी बॉर्डरवर अडवली जातील, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या बरीच मोठी असते. या काळात महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. अवजड वाहनांमुळे या कोंडीत आणखी भर पडते. त्यामुळे चाकरमानी प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य अवजड वाहनांना महाराष्ट्रात प्रवेश बंदी आहे.
दरवर्षी अवजड वाहने बांदा सटमटवाडी टोलनाक्यावर थांबविली जातात. सदर वाहनांना गोव्यातच थांबवावे, अशी मागणी कल्याणकर यांनी केली आहे. अन्यथा सदर वाहने पत्रादेवी बॉर्डरवर अडवली जातील, असा इशारा कल्याणकर यांनी दिला आहे.











