नाणोस येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करण्याची वेळ

नाणोस ते शिरोडा एसटी बसच्या वेळेत बदल करण्याची पालकांची मागणी

नाणोस: नाणोस येथील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिरोडा येथील अ. वि. बावडेकर विद्यालय तथा बा. म. गोगटे कनिष्ठ महाविद्यालयात जावे लागते. मात्र, बसच्या वेळेमुळे त्यांना दररोज सुमारे अडीच तास पायी प्रवास करावा लागतो. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नाणोस येथील पालकांनी एसटी आगाराकडे बसच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली आहे.

नाणोस रेडिगाव येथील विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज शिरोडा येथे जातात. नाणोस ते शिरोडा हे अंतर सुमारे एक ते दीड तासांचे आहे, परंतु एसटी बसची येण्याची आणि सुटण्याची वेळ लवकर असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत नाही. त्यांना बस मिळत नसल्याने दररोज अडीच तास पायी प्रवास करावा लागतो. या पायपिटीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

या मार्गावरून पायी चालताना भटके कुत्रे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोकाही त्यांना सतत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची ही मोठी अडचण दूर करण्यासाठी एसटी बस नाणोस गावात सकाळी अर्धा तास अगोदर यावी आणि संध्याकाळी शिरोडा येथून अर्धा तास उशिरा सोडावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

या मागणीचे निवेदन पालकांनी सावंतवाडी आणि वेंगुर्ले आगाराला दिले आहे. या निवेदनावर किशोर नाणोसकर, कीर्ती नाणोसकर, नितीन नाणोसकर, विद्या नाणोसकर, सुधाकर नाणोसकर, अमिता नाणोसकर, सखाराम जोशी, समिता जोशी, सरिता जोशी आणि संजय जोशी यांच्या सह्या आहेत. या मागणीचा विचार केला जाईल, असे आश्वासन एसटी प्रशासनाने पालकांना दिले आहे.