दुकानातील साहित्य खाक : हजारो रुपयांचे नुकसान
अग्निशमन बंब वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला
सावंतवाडी: शहरातील सालईवाडा परिसरात असलेल्या दत्तप्रसाद शिरसाट यांच्या स्टेशनरी दुकानाला आज, रविवारी रात्री ८.४५ च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून, हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सावंतवाडी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या तात्काळ मदतीमुळे तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे आग वेळीच विझविण्यात यश आल्याने परिसरातील इतर दुकाने आणि घरांना असलेला धोका टळला. यामुळे मोठा अनर्थ वाचला आहे.
अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दुकानाच्या लगतच अनेक दुकाने आणि घरे असल्याने आगीचा भडका उडून मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु, सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आग विझवण्यात यश आले आणि पुढील अनर्थ टळला.
या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.












