मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांच्या कडक भूमिकेमुळे यावर्षी मत्स्योत्पादन वाढणार

विजयदुर्ग येथील स्थानिक मच्छीमारांचा विश्वास

      विजयदुर्ग ( प्रतिनिधी ) : विजयदुर्ग समुद्रामध्ये पावसाळ्यानंतर माशांची उत्पत्ती निश्चितच वाढणार असल्याची प्रतिक्रिया येथील स्थानिक मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे. मच्छिमार बंदी उठवल्यानंतर येथील मच्छीमारीला सुरुवात झाली आहे. मात्र मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैद्य मासेमारी संदर्भात कठोर कारवाई करण्यासाठी पाऊले उचलली गेली. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून परराज्यातील ट्रॉलर्सवरील मच्छीमारीला आळा बसला. त्यामुळे पर्सनेटद्वारे विजयदुर्ग बंदरात बंदीच्या काळात जी अवैद्य मच्छीमारी चालू होती ती बंद झाली. पर्सनेटद्वारे बंदीच्या काळात होणारी मच्छीमारी पारंपारिक मच्छीमारीला घातक होती. पर्सनेट जाळे थव्याभोवती घट्ट होत असल्यामुळे छोटे मासे, पिल्ले आणि अंडी घालणारे मासेही त्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे भविष्यातील मासे साठा कमी होत होता. पर्सनेटद्वारे एकाच वेळी संपूर्ण थवा पकडला जातो. हेच थवे किनाऱ्याजवळ यायला अनेक आठवडे लागतात. त्यामुळे स्थानिक मच्छीमाराना पुढील काळात मासे मिळणे कठीण होते. याचबरोबर डॉल्फिन, कासव, शार्क, अन्य दुर्मिळ मासे देखील या काळात जाळ्यात अडकतात. मोठ्या बोटीनी माशांची ही उत्पत्ती संपवली की, पावसाळ्यानंतर मच्छीमारी सुरू झाल्यानंतर मच्छीमार दुष्काळ जाणवतो. मासे जेव्हा अंडी घालायला येतात तेव्हाच पर्सनेट बोटी थवे पकडतात. त्यामुळे प्रजनन अपूर्ण राहते.

मात्र मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी पारंपारिक पर्सनेट बोटी संदर्भात कठोर निर्णय घेतल्यानंतर मत्स्य उत्पादनात वाढ झाली आहे. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माहितीनुसार महाराष्ट्रात सागरी किनाऱ्यावर मत्स्योत्पादन ४७ टक्के वाढले आहे. दरम्यान, विजयदुर्ग बंदरात परप्रांतीयांची घुसखोरी पूर्णपणे बंद झाल्यामुळे यावर्षी मच्छीमारीला ऊर्जावस्था येईल आणि मच्छीमार बांधव तसेच मत्स्यखवय्ययांना चांगले दिवस येतील असा विश्वास स्थानिक मच्छीमारांमधून व्यक्त होत आहे