निवजे सरपंचांसहित ग्रामपंचायत सदस्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यात ठाकरे शिवसेनेला शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी मोठा धक्का दिला आहे. तालुक्यातील ठाकरे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या निवजे ग्रामपंचायतमधील ठाकरे सेनेचे विद्यमान सरपंच महेंद्र पिंगुळकर आणि सदस्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. निवजे गावचे सरपंच आणि सदस्य यांनी केलेला शिंदे शिवसेनेत केलेला हा प्रवेश माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का मानला जात आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जि. प. सदस्य दीपलक्ष्मी पडते, जि. प. सदस्य रुपेश कानडे, पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, तालुकाप्रमुख विनायक राणे, माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते, माजी जि. प. अध्यक्ष काका कुडाळकर, मालवण उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, विलास पालव, देवेंद्र नाईक, पिंटू राऊळ, पंचायत समिती सदस्य दिव्यांनी खरात, घावनाळे सरपंच दिनेश वारंग, निवजे शाखाप्रमुख सखाराम चव्हाण, राजू शेडगे, विलास पालव, अनिकेत तेंडोलकर, कुडाळ शहरप्रमुख अभिषेक गावडे, दिनेश शिंदे, विजय जाधव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, निवजे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार निलेश राणे यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेले सरपंच महेंद्र पिंगुळकर आणि ग्रामपंचायत सदस्यांचे स्वागत केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार निलेश राणे म्हणाले की, मी विकासकामे करताना कोणावरही उपकार केलेले नाहीत. ही खासदार नारायण राणे यांची शिकवण आहे. आजपर्यंत जे राणे कुटुंबाला मिळाले ते सिंधुदुर्गातील लोकांमुळे मिळाले. आमचे जीवनच सिंधुदुर्गातील लोकांसाठी आहे. २०२४ च्या खासदारकीच्या निवडणुकीत नारायण राणे जे ५० हजार मतांनी निवडून आले ते येथील जनतेने दिलेल्या मताधिक्यामुळे होय. देशातील आमचे हे पहिले कुटुंब असेल की, जनतेतून निवडून आलेले तिघेही आज वेगवेगळ्या पदांवर आहेत. याचे सर्व श्रेय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला जाते. त्यामुळे काम करताना ते आमचे कर्तव्य आहे.
ज्या विश्वासाने सरपंच आणि सदस्य आमच्या पक्षात आले त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, असा शब्द यावेळी आमदार निलेश राणे यांनी देताना मागील १० वर्षातील बॅकलॉग या मतदारसंघात जो होता तो भरून काढण्यासाठी मी प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली.
शासकीय अधिकाऱ्यांना अजून कामाची सवय नाही, काम कसे करायचे? याची त्यांना अजून शिस्त नाही. त्यांना शिस्त लावण्याचे काम मी पावणे दोन वर्षांपासून मी करतोय.
हा मतदारसंघ महाराष्ट्राच्या २८८ मतदारसंघातून गायब झाला होता. मंत्रालयातील अधिकाऱ्यांना कुडाळ-मालवण मतदारसंघ आहे हे माहितच नव्हते. आता हे सर्व बदललेले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेत की, निलेश राणे यांनी जी कामे दिलीत ती झालीच पाहिजेत.
सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य हे निष्ठेने राहिले. पण तिथे तुम्ही सडलात पण तिथेच राहिलात. कारण, तुमची निष्ठा होय. त्यामुळे तुमचे मी मनापासून कौतुक करतो. अशी निष्ठा या जगात फार कमी मिळते. शेवटी तुम्ही इथे यायचा निर्णय घेतला. गावासाठी घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे.
आमच्या पक्षात कौटुंबिक नाते:
यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले की, आमच्या पक्षात कौटुंबिक नाते आहे. आमच्या पक्षातील नाते कुठल्या पैशामुळे नाही. त्यामुळे आज तुम्ही कुटुंबामध्ये प्रवेश केला आहे. येथील लोकांनी जो विश्वास आमच्यावर ठेवला आहे, तो कधीही तुटू देणार नाही. तुम्ही आमच्याबरोबर असलात काय नसलात काय, पण तुमचे काम १०० टक्के होणार !
मतदारसंघात केवळ वर्षाला १०० कोटी निधी यायचा:
कुडाळ-मालवण मतदारसंघात केवळ त्यावेळी जेमतेम वर्षाला १०० कोटीचा निधी येत होता. आपला हा मतदारसंघ राज्याच्या नकाशावरून गायब झाला होता. आज महायुतीच्या माध्यमातून १५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी या मतदारसंघात आणला गेला आहे. आता या मतदारसंघाची नवी ओळख निर्माण केली आहे. येत्या दोन वर्षात या मतदारसंघात विकासकामे मोठ्या प्रमाणात होतील, ज्यामुळे तुम्ही कधी दुसऱ्या जिल्ह्यात जाल त्यावेळी तुम्हाला सांगायला मिळेल की, मतदारसंघ कसा सांभाळायचा हे निलेश राणेंकडून शिकायला मिळेल, असा अभिमान तुम्हाला आपल्या लोकप्रतिनिधीबद्दल वाटेल.
कुडाळ-मालवणचा आमदार कोण होता? हे वॉचमानला माहित नव्हते:
या कुडाळ-मालवण मतदारसंघांची नवीन ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उद्या निलेश राणे असेल-नसेल पण हा मतदारसंघ जिंकला पाहिजे. राज्यात कुडाळ-मालवण मतदारसंघ विकसित झाला अशी ओळख व्हायला हवी. मंत्रालयात या मतदारसंघाची अधिकाऱ्यांकडून दखलच घेतली गेली नाही. विधान भवनाच्या वॉचमनलाच माहीत नव्हते की, येथील आमदार कोण आहे? त्यामुळेच कापसाला भाव देता मग माझ्या भातपिकाला पण भाव मिळाला पाहिजे. आरोग्य, शिक्षण, दळणवळण सेवा आमच्या मतदारसंघातही दिली पाहिजे, ही माझी मागणी आहे.
कुडाळ एमआयडीसीमध्ये २४ तास वीज व पाणीपुरवठा राहणार :
आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे. पुढे एमआयडीसीमध्ये २४ तास वीज व पाणीपुरवठा सुरू राहिला पाहिजे यासाठी ९० कोटी रुपये आवश्यक आहेत. यासाठी त्यांनी निधी देण्याचे त्यांनी कबूल केले आहे. तसेच रत्नागिरीमध्ये कोको कोला कंपनीचे ज्याप्रमाणे युनिट आले आहे, त्याप्रमाणे कुडाळमध्ये सुद्धा व्हावे अशी मागणी केली आहे. रोजगार निर्माण व्हावेत याकडे आमचे पूर्णपणे लक्ष आहे.













