सोहम देशमुख १९ वर्षाखालील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता

सावंतवाडी । प्रतिनिधी :
 आयडियल चेस अकॅडमी, वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित १९ वर्षांखालील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीच्या स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा १३ वर्षीय खेळाडू कु. सोहम देशमुख याने विजेतेपद पटकावले आहे. वेंगुर्ल्यातील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात झालेल्या या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून १४० खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेमध्ये सोहम देशमुखने आपले कौशल्य सिद्ध करत आठपैकी आठ फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आणि आठ गुणांसह तो स्पर्धेचा मानकरी ठरला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला चषक आणि रोख रक्कम बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आली.

या स्पर्धेचे आयोजन आयडियल चेस अकॅडमी, वेंगुर्ला यांनी केले होते. या संस्थेच्या माध्यमातून युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि बुद्धिबळ खेळाला जिल्ह्यामध्ये लोकप्रिय करण्यासाठी असे उपक्रम राबवले जातात. सोहमच्या या विजयामुळे त्याच्या प्रशिक्षकांचे आणि शाळेचे नाव उज्वल झाले असून भविष्यात तो राष्ट्रीय स्तरावरही चांगली कामगिरी करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.