कोकण रेल्वे प्रवाशांना दिलासा : १५ ऑगस्टपासून दोन्ही दिशांच्या गाड्या थांबणार
राजापूर : कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईहून केरळला जाणाऱ्या आणि येणाऱ्या १६३४५/१६३४६ क्रमांकाच्या लोकमान्य टिळक (ट) – तिरुवनंतपुरम सेंट्रल “नेत्रावती” एक्सप्रेसला आता राजापूर रोड स्टेशनवर प्रायोगिक थांबा देण्यात येणार आहे. हा थांबा येत्या स्वातंत्र्यदिनापासून म्हणजेच १५ ऑगस्ट, २०२५ पासून सुरू होणार आहे. यामुळे राजापूर आणि परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वेळापत्रक खालीलप्रमाणे:
* १६३४५ लोकमान्य टिळक (ट) – तिरुवनंतपुरम सेंट्रल “नेत्रावती” एक्सप्रेस: ही गाडी राजापूर रोड स्टेशनवर सायंकाळी १९:४० वाजता पोहोचेल आणि १९:४२ वाजता पुढे मार्गस्थ होईल.
* १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (ट) “नेत्रावती” एक्सप्रेस: ही गाडी सकाळी ०७:३८ वाजता राजापूर रोड स्टेशनवर पोहोचेल आणि ०७:४० वाजता सुटेल.
हा थांबा सध्या प्रायोगिक तत्त्वावर असून प्रवाशांच्या प्रतिसादानुसार तो कायमस्वरूपी केला जाऊ शकतो. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.
गाड्यांच्या सविस्तर थांब्यांसाठी आणि वेळापत्रकासाठी प्रवाशी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळ www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊ शकतात.
या निर्णयामुळे मुंबई आणि दक्षिण भारताकडे प्रवास करणाऱ्या राजापूरमधील प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली आहे. कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी ही माहिती दिली आहे.












