खेड – ( प्रतिनिधी )
स्वातंत्र्यनिमित्त केंद्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या ’हर घर तिरंगा’, ’आझादी का अमृत महोत्सव’ अभियानांतर्गत रोटरी स्कूलमध्ये दिनांक 2 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान पहिल्या पर्वाला प्रारंभ झाला. या अभियानांतर्गत साठी तिरंगा थीमवर आधारित विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये रांगोळी स्पर्धा, राखी बनविणे व पोस्टर्स बनविणे या स्पर्धा घेण्यात आल्या. शाळेतील विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षक व शाळेतील कलाशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्यातील कलागुण सादर करत मनमुराद आनंद लुटला. बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे, राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
संस्कारक्षम शिक्षणातून संस्कृतीचे जतन, हसत खेळत शिक्षण, मनोरंजन, प्रत्येक सणाचा योग्य परिचय अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेली रोटरी शाळा. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने शिक्षणाबरोबरच खेळ, नृत्य, संगीत, चित्रकला, नाट्य यांसारख्या विविध कलांची आवड निर्माण करण्यासाठी रोटरी स्कूल नेहमीच प्रयत्नशील असते.












