गुहागर | प्रतिनिधी
श्रावण महिन्यात गोडाचा आस्वाद घ्यावा म्हणून आणलेले पेढे गुहागर तालुक्यातील ११ महिलांसाठी संकट ठरले. शृंगारतळी येथील अय्यंगार बेकरीमधून आणलेल्या पेढ्यांचे सेवन केल्याने वेदांत ज्वेलरीमध्ये काम करणाऱ्या महिलांना सोमवारी दुपारी विषबाधा झाली.या प्रकरणानंतर गुहागर मनसे आता ॲक्शन मोडवर आली आहे.अन्न व प्रशासन विभागाने याकडे गांभीर्याने पाहून तत्काळ कारवाई करण्याची मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी केली आहे.
शृंगारतळीतील ग्रामपंचायत पाटपन्हाळेच्या पाठीमागील इमारतीत वेदांत ज्वेलरीचे मालक बळीराम साळवी मुंबईहून आणलेले दागिन्यांचे मटेरियल महिलांना देऊन त्यांच्याकडून काम करून घेतात. सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजता एका महिलेनं अय्यंगार बेकरी येथून पेढे आणून प्रत्येकाला अर्धा-अर्धा पेढा दिला. काही वेळातच सर्व महिलांना चक्कर, उलटी व अस्वस्थता जाणवू लागली.जवळपास 11 महिलांना यावेळी पेढ्यातून विषबाधा झाली असल्याचा प्रकार समोर आला.यानंतर
मनसे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन विषबाधा झालेल्या महिलांची विचारपूस केली.यावेळी मनसे तालुका अध्यक्ष सुनिल हळदणकर, तालुका सचिव प्रशांत साठले, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष प्रथमेश रायकर,शुंगारतळी गण उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी विभाग अध्यक्ष विश्वजीत पोद्दार महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते यावेळी तालुका अध्यक्ष सुनिल हळदणकर यांनी सांगितले की प्रशासकीय अधिकारी यांनी योग्य ती कारवाई केली नाही तर मनसे खळ खट्याक करण्यात येईल.
शृंगारतळी बाजारपेठेतील सर्व बेकऱ्या व हॉटेल व्यवसाय तसेच अन्य खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकानांची पाहणी करावी अशी मागणी यापूर्वीच मा.सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन रत्नागिरी यांच्याकडे निवेदनातून केली होती मात्र याकडे वारंवार डोळेझाक होत असल्यानेच हा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप मनसेने केला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, “शृंगारतळीत अनेक बेकऱ्या चालतात, मात्र त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण व तपासणी नसल्याने अन्नसुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अन्न व प्रशासन विभाग अनाधिकृत अनेक व्यावसायिक यांच्याकडे डोळेझाक का करत आहे?”
गुहागर तालुक्यातील अनेक व्यावसायिक, बेकरी ,पाणीपुरी, टपरीवाले, आईस्क्रीम, थंडपेय विक्रीते, चायनीज, बिर्याणी यांच्याकडे जाणूनबुजून डोळेझाक करत आहे असा सवालही विनोद जानवळकर यांनी पुन्हा उपस्थित केला आहे.












