उत्साह आणि स्त्रीशक्तीचा जल्लोष : ‘श्रावण स्मार्ट सखी 2025’ स्पर्धेत दिशा भाटकर विजेती

रत्नागिरी – उदय सामंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘श्रावण स्मार्ट सखी 2025’ या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी (१० ऑगस्ट) जल्लोषात पार पडली. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या २१ सख्यांनी केवळ दोन दिवसांच्या तयारीनंतर वेशभूषा, स्टेजवरील वावर आणि संवाद कौशल्यात दमदार प्रदर्शन करत स्पर्धेला रंगत आणली.

अंतिम फेरीत पहिल्या टप्प्यात मराठमोळ्या वेशभूषेत आणि पाश्चात्य ठेक्यावरही सख्या तितक्याच सहजतेने वावरल्या. दुसऱ्या टप्प्यात नृत्य, गीत, अभिनय आणि योगासह विविध कला सादर करून स्पर्धकांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. तिसऱ्या फेरीत परीक्षकांच्या प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे देत स्पर्धकांनी आपली बुध्दीमत्ता सिध्द केली.

निकालात दिशा भाटकर यांना विजेतेपद मिळाले, तर अनघा नाचणकर पहिली उपविजेती आणि विजेता मोर्ये दुसरी उपविजेती ठरल्या. विशेष परितोषिकांत उत्तम व्यक्तिमत्व – दीपिका कुबल, उत्कृष्ट पेहराव – सौम्या घुडे, मोहक हास्य – योगिता खांडेकर, उत्तम ज्येष्ठ व्यक्तिमत्व – कुमुदिनी शेट्ये यांचा समावेश होता.

विजेत्यांना प्रतिष्ठानतर्फे भेटवस्तूंसह अमेय ज्वेलर्सकडून नेकलेस आणि जी.के. कॉस्मेटिक्सकडून गिफ्ट हॅम्पर देण्यात आले. याशिवाय सप्टेंबरमध्ये होणाऱ्या दिवाळी शॉपिंग फेस्ट 2025 च्या उद्घाटनाचा मान पहिल्या तिघा विजेत्यांना देण्यात येणार असल्याची घोषणा सहकार बोर्ड अध्यक्ष व व्यापारी संघटनेचे मार्गदर्शक हेमंत वणजू यांनी केली.

स्पर्धेच्या यशात दिलसे क्रिएशनचे सिद्धेश बंदरकर, दीपक पवार, प्रथमेश साळवी, अभिजीत दुडे, ॲड. निलोफर खान, ध्वनीव्यवस्थेसाठी पानवलचे ‘डावा साउंड’चे होरंबे, छायाचित्रण व व्हिडिओग्राफीसाठी कांचन मालगुंडकर, नाट्यगृह कर्मचारी, तसेच शिवसेना शहर महिला आघाडी व जिल्हा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग राहिला.

कार्यक्रमात युवती दिक्षा मांडवकर, रिया मांडवकर, श्रावणी राऊत, सानिया दळवी, वेदिका चव्हाण, उत्कर्षा नाचणकर, वैष्णवी खंडारे, सेजल किर, शिवानी पवार, सेजल शिंदे, मनस्वी नागवेकर यांनीही व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली. परीक्षक म्हणून ॲड. समृद्धी मयेकर आणि डॉ. अनुराधा लेले, तर सूत्रसंचालन सौ. पूर्वा पेठे यांनी केले.

या संकल्पनेमागील प्रेरणास्थान, उद्योग व ऊर्जेचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी पुढील वर्षी अधिक उत्साहाने ही स्पर्धा घेण्याचा मनोदय व्यक्त केला.