रत्नागिरीत १५ ऑगस्टला जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सव व पाककला स्पर्धा

रत्नागिरी – कृषी विभाग, रत्नागिरी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) रत्नागिरी, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प आणि रोटरी क्लब, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सव, पाककला स्पर्धा आणि विविध कृषी विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत अंबर हॉल, टी.आर.पी., रत्नागिरी येथे होणार आहे.

या कार्यक्रमाला उद्योग, मराठी भाषा तसेच पालकमंत्री डॉ. उदय स्वरूप रवींद्र सामंत प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सव व पाककला स्पर्धेसह सिंधुरत समृद्ध योजनेअंतर्गत आंबा बागायतदारांना वाहतूक वाहन निधी वितरण, स्मार्ट प्रकल्पांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रक्रिया धारकांसाठी खरेदीदार-विक्रीदार संमेलन तसेच आंबा उत्पादक व मत्स्य व्यवसायिकांसाठी आयात-निर्यात कार्यशाळा यांचा समावेश आहे.

शेतकरी, उद्योजक, पाककला रसिक व व्यावसायिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.