कर्कश सायलेन्सर लावणाऱ्या दुचाकीवर पोलिसांची कारवाई

प्रहार डिजिटलने वेधले होते लक्ष

नियमबाह्य बदल केल्याप्रकरणी १,५०० रुपयांचा दंड

कणकवली : शहरात कर्कश आवाज करणारे नियमबाह्य सायलेन्सर व प्रखर फॅन्सी लाईट्स लावून फिरणाऱ्या वाहनांमुळे नागरिक त्रस्त असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रहार डिजिटलने या समस्येकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर कणकवली पोलिसांनी कारवाई करत एका दुचाकीवर दंडात्मक कारवाई केली. संबंधित वाहनावरील नियमबाह्य सायलेन्सर काढून टाकण्यात आला.

शहरातील प्रमुख रस्ते व बाजारपेठ परिसरात काही वाहनचालकांकडून सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ्या आवाजात वाहने चालवली जात असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. तसेच काही वाहनांवर प्रखर फॅन्सी लाईट्स बसविण्यात आल्याने इतर वाहनचालक व पादचाऱ्यांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत प्रहार डिजिटलने वृत्त प्रसिद्ध करून संबंधित प्रकाराकडे लक्ष वेधले होते.

याची दखल घेत कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिलीप पाटील यांनी संबंधित दुचाकीचा शोध घेतला. त्यानंतर वाहनमालक बाळकृष्ण शिवराम जगताप व वाहनचालक अनिरुद्ध बाळकृष्ण जगताप (वय २०, रा. भरणी तांबळवाडी, ता. कणकवली) यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले.

तपासाअंती वाहनावर नियमबाह्य सायलेन्सर व प्रखर प्रकाश देणारे लाईट्स बसविण्यात आल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी अनधिकृत सायलेन्सर वापरल्याबद्दल १,००० रुपये व धोकादायक फॅन्सी लाईट्स बसवल्याबद्दल ५०० रुपये असा एकूण १,५०० रुपयांचा दंड आकारला.

दरम्यान, पोलिसांनी संबंधित वाहनावरील नियमबाह्य सायलेन्सर तात्काळ उतरवून कंपनीचा मूळ सायलेन्सर बसविण्याचे निर्देश दिले. वाहनावर मूळ सायलेन्सर बसवल्यानंतरच वाहन सोडण्यात आले.

शहरातील वाहतूक शिस्त, ध्वनीप्रदूषण नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा प्रकारच्या नियमभंग करणाऱ्या वाहनांवर यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.