खेड – लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत, प्रशासनाच्या सहकार्याने खेड वेरळ येथील विशेष मुलांची शाळा अनुग्रह येथील विद्यार्थ्यांना सहभागी करून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीतून विशेष मुलंदेखील या देशाचे समान घटक आहेत, देशासाठी योगदान देऊ शकतात आणि त्यांना तितक्याच सन्मानाने व स्वीकाराने समाजात स्थान मिळायला हवे, हा संदेश देण्यात आला.
या रॅलीला प्रमुख पाहुणे म्हणून प्रांत प्रमुख वैशाली पाटील मॅडम व तहसीलदार सोनवणे साहेब उपस्थित होते. त्याचबरोबर विविध पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांनीही उपस्थित राहून या उपक्रमाला समर्थन दिले. मान्यवरांमध्ये माजी नगराध्यक्ष अरविंद शेठ तोडकरी, माजी नगरसेवक भूषण चिखले, सामाजिक कार्यकर्ते उत्तम कुमार जैन, लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, झोन चेअरमन मिलिंद तलाठी, माजी अध्यक्ष रोहन विचारे, खजिनदार माणिक लोहार, उपाध्यक्ष अविनाश दळवी, शैलेश धारिया, सागर आंजरलेकर, संतोष शिंदे, जितेंद्र भिलारे, ओमकार गोंदकर, सागर करवा, विवेक कदम यांचा समावेश होता. तसेच अनुग्रह शाळेच्या प्रिन्सिपल रोजी मॅडम व संपूर्ण शिक्षकवर्ग उपस्थित होता.
रॅलीचे नियोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून तहसील कार्यालयापर्यंत करण्यात आले होते. या वेळी तहसीलदार सोनवणे साहेब यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करत, या रॅलीचे नियोजन केल्याबद्दल लायन्स क्लबचे विशेष अभिनंदन केले. प्रांत प्रमुख वैशाली पाटील यांनी शाळा चालवणाऱ्या शिक्षकवर्गाच्या मेहनतीचे व समर्पणाचे कौतुक केले आणि त्यांचे आभार मानले.
सामाजिक कार्यकर्ते उत्तम कुमार जैन यांनी विशेष मुलांबद्दल उपस्थितांना माहिती देत, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या लायन्स क्लबचे कौतुक केले. माजी अध्यक्ष रोहन विचारे यांनी रॅलीमागील संकल्पना सांगताना, या मुलांना समाजापासून वेगळे न ठेवता एकरूप करण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचे सांगितले.
प्रशालेच्या वतीने लायन्स क्लबचे आभार मानण्यात आले, कारण जिल्ह्यात अशा प्रकारची रॅली प्रथमच आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी लायन सागर करवा यांनी विद्यार्थ्यांना ज्यूसचे वाटप केले. रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष महेंद्र शिरगावकर व त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली.
या उपक्रमातून खेड शहरात देशभक्ती, सामाजिक एकात्मता आणि विशेष मुलांविषयी जागरूकता वाढवण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.











