8 पैकी 6 जणांची विभागीय स्तरावर निवड
दोडामार्ग l प्रतिनिधी :दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी येथील करुणा सदन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत अभूतपूर्व यश मिळवून शाळा आणि तालुक्याची मान उंचावली आहे. सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत शाळेच्या ८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी तब्बल ७ विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई केली आहे. या शानदार कामगिरीमुळे यशस्वी आठ पैकी सहा विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत कुमारी श्रेया सुहास देसाई, सान्वी नाईक, श्लोक सावंत, मोहन नाईक, अमय बेलणकी आणि एम. देवदेत मनोज यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकावले. त्याची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे तर पार्थ संदीप दळवीने कांस्यपदकाची कमाई केली आहे.
या विद्यार्थ्यांच्या यशामागे कराटे प्रशिक्षक श्री. बाळकृष्ण कर्पे, क्रीडा शिक्षक श्री. प्रवीण केसरकर यांचे कुशल मार्गदर्शन आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सबीना यांचे प्रोत्साहन कारणीभूत ठरले. यासोबतच पालकांच्या सहकार्याचेही मोलाचे योगदान लाभले, असे यशस्वी विद्यार्थ्यांनी सांगितले.
या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सबीना, कराटे प्रशिक्षक श्री. बाळकृष्ण कर्पे आणि क्रीडा शिक्षक श्री. प्रवीण केसरकर यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
करुणा सदन विद्यालय परिवार आणि संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात या यशाबद्दल आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे पाठबळ या त्रिवेणी संगमामुळेच हे यश प्राप्त झाले आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
छायाचित्र: साटेली-भेडशी येथील करुणा सदन शाळेचे पदकविजेते विद्यार्थी, मुख्याध्यापिका आणि मार्गदर्शक शिक्षक.











