स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त कार्यक्रमावर फोंडाघाट मधील धुवांधार कोसळणाऱ्या पावसाने मर्यादा !

मात्र गोपाळकाला आणि दहीहंडी सोहळ्या साठी बालगोपाळ – ग्रामस्थ उत्साही !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — वादळवारा, पाऊसधारा आणि येलो अलर्ट कडे दुर्लक्ष करत, फोंडाघाट मध्ये सर्वत्र भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संततधार कोसळत असूनही बाजारपेठेमध्ये अनेक ठिकाणी देशभक्तीपर गीतांची धून वाजत होती. आयटीआय, नवीकुर्ली वसाहत,माळवाडी- हवेली नगर प्राथमिक शाळा, फोंडा एसटी स्टँड स्थानक, ग्रामपंचायत,केंद्रशाळा नंबर एक सह वाडी – वाडी वरील प्राथमिक शाळांमध्ये ध्वजवंदन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा,भाषणे उत्साहात पार पडली. मुलांसह पालक वर्गाची लगबग कोसळणाऱ्या पावसाबरोबर वाढत होती. सर्वत्र स्वातंत्र्याची भाषण,क्रांतिवीरांच्या आठवणींना उजाळा दिला जात होता.

 

 

 

एसटी स्टँडवर नियंत्रकांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या ठिकाणी हवेलीनगर प्राथमिक शाळेची प्रभात फेरी आल्यावर स्पृहा गणपत राजम व नजराणा मुजावर यांच्या स्फूर्तीदायी भाषणाने उपस्थित ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.संजीवनी हेल्पलाइन ग्रुप तर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे पेठेतील सर्वांना जिलबी वाटप करण्यात आले.

 

 

 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून फोंडाघाट ग्रामस्थांतर्फे ग्रामपंचायतच्या आयोजनातून, केंद्रशाळा फोंडा नंबर एक येथे ध्वजवंदनाचा सामुदायिक सोहळा संपन्न होतो. याला पंचक्रोशीतील अबालविरुद्ध ग्रामस्थ, महिला, तसेच शाळा- हायस्कूल, कॉलेज चे विद्यार्थी- विद्यार्थिनी, शिक्षकवर्ग,बँका, संस्थांचे अधिकारी,ग्रामपंचायत, महसूल, कृषी विभागाचे कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभते. सरपंच सौ संजना आग्रे यांचे हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर मुलांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत सादर केले. संविधानाचे वाचन झाल्यावर सरपंच आग्रे यांनी उपस्थितांना संबोधित केले .धुवांधार पाऊस असल्याने इतर कार्यक्रमांना बगल देऊन सोहळा आटोपशीर करण्यात आला.संततधार पावसामुळे स्वातंत्र्य दिन सोहळ्यावर मर्यादा आल्या. मात्र येणारा गोपाळकाला आणि दहीहंडीचा च्या पार्श्वभूमीवर गेले तीन- चार वर्षे या दिवशी पाऊस नसल्यामुळे “घरात नाही पाणीsss,घागर उताणी रेss गोविंदा” म्हणण्याची पाळी येणार नाही.त्यामुळे यावर्षी बालगोपाळांचा उत्साह दुथडी भरून वाहत आहे…