खेडमध्ये जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी; शहराला पुराचा धोका

खेड (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील नद्या-नाले धोकादायक स्थितीत पोहोचले आहेत. १५ ऑगस्टपासून कोसळणाऱ्या अविरत पावसाचा फटका खेड शहरालाही बसत असून, खेडजवळून वाहणाऱ्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदीची इशारा पातळी ५ मीटर तर धोका पातळी ७ मीटर इतकी आहे. सध्या नदीचे पाणी ६ मीटरवरून वाहत असल्याने शहरात पुन्हा एकदा पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

जगबुडी नदीचे पाणी पात्राबाहेर पडून खेडमधील मटण-मच्छी मार्केट परिसरासह शेजारील रस्त्यांमध्ये शिरले आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे व्यापारी व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खेड नगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत परिस्थिती हाताळण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

खेड नगरपरिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे की, “खेड शहरातील सर्व नागरिक व व्यापाऱ्यांना सूचित करण्यात येते की, रात्रीपासून पाऊस जोराचा पडत आहे. नारंगी व जगबुडी नद्या इशारापातळी ओलांडून वाहत आहेत. सर्वांनी सतर्कता बाळगावी, आपले सामान व कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे.”

नगरपरिषदेने दिलेल्या या सूचनेनंतर शहरात प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा हायअलर्टवर असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास जगबुडी नदी धोका पातळी गाठण्याची शक्यता असल्याने खेडवासीयांची चिंता अधिक वाढली आहे.