शेकडो नागरिकांचा संपर्क तुटला
दापोली : दापोली तालुक्यातील वाकवली–उन्हावरे मुख्य रस्त्यावर असणाऱ्या असोंड गावातील एसटी स्टँडवरून कुंभारवाडीकडे जाणारा रस्ता आणि मोरी कालच्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे वाहून गेली. त्यामुळे गणेशवाडी तसेच अर्धी कुंभारवाडी या वस्त्यांचा गावाशी संपर्क तुटला असून शेकडो नागरिक अडचणीत आले आहेत.

१६ व १७ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याशेजारील ओढा भरून वाहू लागला. प्रचंड पाण्याच्या लाटांनी मोरी वाहून गेली आणि त्याचबरोबर रस्ताही खचून गेला. या रस्त्यावरील मोरीवरूनच नळपाणी योजनेचा मार्ग असल्याने पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. रस्त्यालगत असलेली गावाची पिण्याच्या पाण्याची विहीर देखील आता नागरिकांसाठी दुर्गम ठरली आहे.

हा रस्ता वाकवली–असोंड–उन्हावरे मुख्य रस्त्याला जोडणारा असल्याने नेहमीच वाहतुकीने गजबजलेला असतो. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्याचवेळी ग्रामपंचायतीने मोरीच्या जागी पुलाची मागणी केली होती. मार्च २०२३ पूर्वी जिल्हा परिषद विभागाकडेही या संदर्भात लेखी पत्र पाठवण्यात आले होते. मात्र अद्याप मंजुरी न मिळाल्यामुळेच ही आपत्ती ओढवली असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या घटनेनंतर असोंड-शिवनारी ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिपक देवरुखकर, माजी सरपंच व विद्यमान सदस्य मनिषा करमरकर, तसेच दिपक परबलकर यांनी सांगितले की, “दरवर्षी पावसाळ्यात हा रस्ता खचतो. पुलाची मागणी वारंवार केली असूनही शासन व जिल्हा परिषद विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. शासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर नागरिकांचे हाल आणखी वाढतील.”
घटनेची माहिती मिळताच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच गावातील प्रकाश माणके, चंद्रकांत परबलकर, रघुनाथ परबलकर, मनोहर परबलकर यांसह अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
याबाबत जिल्हा परिषद दापोली बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदरचा रस्ता हा असोंड ग्रामपंचायतीच्या अख्त्यारीत येतो. घटनास्थळाची माहिती घेतली जाईल आणि तात्पुरत्या स्वरूपात रस्ता तयार करून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी उपाययोजना केली जातील.











