रत्नागिरी:
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, एन.डी.पी.एस. अॅक्टअंतर्गत (NDPS Act) एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तब्बल १ किलो २९१ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, एकूण ८०,१०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
काय घडली घटना?
दिनांक ०८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १६.३३ वाजेच्या सुमारास रत्नागिरी जवळील उद्यम नगर येथील काझी चाळ भागात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे सपोफौ/१४९१ राजेश भास्करराव भुजबळराव यांनी फिर्यादी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल समिर सोलकर (वय २७ वर्षे, रा. मराठी शाळेजवळ, कोकणनगर, रत्नागिरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा त्याच्या राहत्या रूमवर बेकायदेशीररीत्या गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने हा अंमली पदार्थ बाळगून असल्याची माहिती समोर आली.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ८०,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे:
एका पारदर्शक प्लॅस्टिक पिशवीत खाकी रंगाच्या चिकट पट्टीने गुंडाळलेला, ९१० ग्रॅम निव्वळ वजनाचा (पिशवीसह ९२१ ग्रॅम) गांजा.
निळ्या रंगाच्या पिशवीमध्ये ३८१ ग्रॅम निव्वळ वजनाचा (पिशवीसह ३८७.५ ग्रॅम) गांजा.
गांजा ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या रिकाम्या पुड्या, पिशव्या आणि १०० रुपये किमतीची एक काळ्या रंगाची प्रवासी बॅग.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८(क), २०(ब), (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.











