वाफोली माऊली गोविंदा पथकाचा सावंतवाडी, कुडाळ तालुक्यात दबदबा

​बांदा : प्रतिनिधी

वाफोली येथील माऊली गोविंदा पथकाने सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यात आपल्या कौशल्याच्या जोरावर दबदबा निर्माण केला आहे. नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवात त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली. मळगाव आणि बांदा गांधीचौक मित्रमंडळाने आयोजित केलेल्या दहीहंडी स्पर्धेत माऊली गोविंदा पथकाने सहा मानवी थरांचा मनोरा रचून दहीहंडी फोडली आणि मानाचे स्थान पटकावले.

​त्याचप्रमाणे पिंगुळी आणि कट्टा कॉर्नर मित्रमंडळ बांदा यांच्या मानाच्या दहीहंडी स्पर्धेतही या पथकाने प्रत्येकी सहा थरांचा यशस्वी मनोरा रचून प्रेक्षकांची मने जिंकली.

​यावेळी डीजेच्या तालावर गोविंदांनी केलेल्या नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
​पथकाने केलेल्या अथक परिश्रमामुळेच हे यश संपादन झाले असून त्यांना अमोल सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
———