आगाशे विद्यामंदिरात दहीहंडी फोडून गोपाळकाला झाला गोड

रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा झाला. श्रीकृष्णाच्या पारंपरिक वेशभूषेत बालगोविंदा, गोपिकांनी फेर धरला. विविध कृष्णगीतांवर विद्यार्थ्यांनी सुरेख नृत्य सादर करून दुसऱ्या थरावर दहीहंडी फोडून गोपाळकाला गोड केला.

दरवर्षी शाळेमध्ये दहीहंडी उत्साहात साजरी होती. शाळा समिती सदस्य दादा कदम, ज्येष्ठ शिक्षिका सौ. गीता सावंत, मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम यांनी श्रीकृष्णाचे पूजन करण्यात आले. महिला व पुरुष पालक प्रतिनिधींनी उत्सवासाठी विविध प्रकारची फळे आणली. पुरुष पालकांनी दहीहंडी सजवण्यासाठीही पुढाकार घेतला. यंदा शाळेची नवीन इमारत असल्याने प्रशस्त पटांगणावर नृत्य व हंडी फोडण्याचा आनंद बाळगोपाळांना मिळाला. विद्यार्थी हंडी फोडताना चिंब भिजले. त्यानंतर सर्व बालदोस्तांना प्रसाद देण्यात आला.

दरम्यान, गीता मंडळातर्फे गीता भवन येथे झालेल्या कार्यक्रमात आगाशे विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी एक तास सुरेख सादरीकरण केले. मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांनी श्रीमद्भगवद्गीता बारावा अध्याय, १८ श्लोकी गीता सादर केली. तसेच कृष्ण जन्मला गं सखे, डॅशिंग गोविंदा, किती सांगू मी सांगू कुणाला, मैय्या यशोदा, बासुरी कृष्ण की बजेगी, घालुया धिंगाणा या गीतांवर नृत्य सादर केले. तसेच हा देश माझा हे समूहगीत व शिक्षकांनी श्रीकृष्णाची आरती सादर केली. सौ. मंजिरी गुणे व प्रेरणा नागवेकर यांनी सूत्रसंचालन केले.