खेड शहरात पुराचे पाणी शिरण्याची भीती
खेड : प्रतिनिधी
खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून खेड-दापोली मार्गावरील सुर्वे इंजिनिअरिंग परिसरात पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे खेड-दापोली मुख्य रस्ता पूर्णपणे बंद करण्यात झाला आहे. यामुळे दापोली तालुक्याचा खेडशी असलेला संपर्क तुटला आहे.
नारंगी नदीला मोठा पूर आल्याने या खेड शहराशी ग्रामीण भागाशी असणारा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील खडीपट्टा विभागातील वाहतूक या पुरामुळे ठप्प झाली होती. त्यातच सुर्वे इंजिनिअरिंग परिसरात पाणी शिरल्याने खेड दापोली मुख्य मार्ग देखील बंद झाला आहे. दरम्यान, जगबुडी नदीची पाणीपातळी ७.४० मीटरपर्यंत पोहोचली असून, ५ मीटर ही इशारा पातळी तर ७ मीटर ही धोका पातळी मानली जाते. त्यामुळे नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड शहरातील खालच्या भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील मटन व मच्छी मार्केट परिसरात देखील पुराचे पाणी शिरले असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खेड बाजारपेठेतही पूराचे पाणी घुसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्यापारी व नागरिकांमध्ये यामुळे मोठी चिंता निर्माण झाली असून प्रशासनाने खबरदारीचा इशारा देत सर्व नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच नदीकाठच्या भागातील रहिवाशांनी सतर्क राहावे व आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.










