पक्षविरोधी वक्तव्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसची कठोर कारवाई; जलाल राजपूरकर यांचे पक्षातून निलंबन

खेड (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खेड तालुका संघटनेत मोठी खळबळ उडाली असून पक्षविरोधी आणि बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी जलाल भाई राजपूरकर यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय जाधव यांनी याबाबत अधिकृत पत्रक जारी करत ही कारवाई केल्याची माहिती दिली आहे.
दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी जलाल भाई राजपूरकर यांनी पक्षाच्या कार्यालयात एकटे बसून कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता तसेच स्वतःकडे कोणतेही अधिकृत पद नसताना जिल्हाध्यक्ष मा. बाबाजीराव जाधव यांच्या कार्यपद्धतीवर बेताल आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे समोर आले. ही वक्तव्ये प्रसार माध्यमांतून प्रसारित झाल्याने पक्षाची प्रतिमा मलिन झाली असून संघटनेच्या हिताला बाधा पोहोचल्याचा आरोप पत्रकात करण्यात आला आहे. पक्षशिस्त आणि संघटनेची एकजूट राखण्यासाठी अशी विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, असे स्पष्ट करत खेड तालुका अध्यक्ष संजय जाधव यांनी
राजपूरकर यांचे तात्काळ निलंबन जाहीर केले आहे. पक्षाच्या अंतर्गत बाबींवर सार्वजनिकरित्या टीका करणे हे शिस्तभंगाचे कृत्य असून त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाध्यक्ष मा. बाबाजीराव जाधव, मा. अजयजी बिरवटकर, मा. सु. तू. कदम तसेच विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात संघटना मजबूत करण्यासाठी पक्ष एकसंघपणे काम करत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षाचे हित जपण्यासाठी आणि शिस्त राखण्यासाठी भविष्यातही आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या कारवाईमुळे खेड तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिस्तीबाबत घेतलेली कठोर भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.