विज्ञानाचे जनक व्हा                          – प्रमोद जठार

विजयदुर्ग किल्ल्यामध्ये विश्व हेलियम दिवस मोठ्या उत्साहात साजरा

   विजयदुर्ग ( प्रतिनिधी ) : ‘ जय जवान जय किसान जय विज्ञान ‘ च्या जयघोषात विजयदुर्ग किल्ल्यामध्ये विश्व हेलियम दिवस साजरा करण्यात आला. सध्याची तरुण पिढी अतिशय जिज्ञासू असून सर्व क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान घेऊन ही पिढी प्रगती करत आहे. याचबरोबर विज्ञानाचीही कास धरून ‘ विज्ञानाचे जनक व्हा ‘ असा संदेश सुनीता शांताराम ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी विजयदुर्ग किल्ल्यामध्ये दिला. किल्ल्यातील ‘ सायबाचे ओटे ‘ येथील माहिती फलकाला पुष्पहार अर्पण करून आणि हेलियम वायूचे फुगे हवेत सोडून विश्व हेलियम दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी नेहरू विज्ञान केंद्र, मुंबईचे सुहास नाईक- साटम, विज्ञानप्रेमी डॉ. सुनील आठवले, पवन परुळेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

शासनाच्या वतीने विजयदुर्ग ग्रामपंचायत आणि सुनीता शांताराम ट्रस्ट, कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम प्रतिवर्षाप्रमाणे राबविण्यात आला. सन २००७ सालापासून माजी आमदार प्रमोद जठार यांच्या पुढाकाराने विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम दिवस साजरा केला जातो. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुसज्ज विज्ञान केंद्र व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करताना प्रमोद जठार यांच्या प्रयत्नाने भावी पिढीला विज्ञानाची आवड निर्माण होत असल्याचे सुहास नाईक- साटम यांनी आवर्जून सांगितलं. ते पुढे म्हणाले की, १८ ऑगस्ट १८६८ साली जरी जोसेफ नॉर्मल लॉकियरने विजयदुर्ग किल्ल्यावरून हेलियमचा शोध लावला तरी हा दिवस साजरा करून जठार यांनी लोकांपर्यंत खऱ्या अर्थी पोहोचवला. यावेळी सुनील आठवले यांनीही हेलियम संदर्भात भाष्य केलं. विजयदुर्ग हायस्कूलचे शिक्षक परचुडे यांनी हेलियमचा शोध, त्याचे महत्त्व आणि उपयोग याविषयी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर घातली.

सुरुवातीला विजयदुर्ग डेपो येथील गणेश मंदिरात श्रीफळ फोडून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात आणि हेलियम वायूचे फुगे घेऊन भव्य रॅली काढण्यात आली. किल्ल्यातील भवानी मातेच्या मंदिराकडून सायबाचे ओटे येथे पुढील कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, माजी पं. स. उपसभापती रवी तिर्लोटकर, माजी पं. स. सदस्या शुभा कदम, विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. कातिवले, पडेल मंडल भाजपा महिलाध्यक्षा सुप्रिया आळवे, भाजपा पडेल मंडल सचिव प्रदीप साखरकर, इतिहासप्रेमी राजेंद्र परूळेकर, ग्रा. पं. सदस्य दिनेश जावकर, वैशाली कीर, प्रतीक्षा मिठबावकर, पूर्वा लोंबर, जॉसलीन फर्नांडिस, सिद्धेश डोंगरे, इतिहासप्रेमी यशपाल जैतापकर, ग्रेसीस फर्नांडिस, दशरथ तळेकर, विनायक चोडणेकर, निलेश मणचेकर, विजय तांबे, शिडवणे सरपंच रवी शेट्ये आदी उपस्थित होते. शेवटी आभार मानताना सरपंच रियाज काझी यांनी सांगितलं की, जरी ग्रामपंचायत या कार्यक्रमाचे आयोजक असले तरी भाजपा पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.