रत्नागिरी : रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त ‘सायबरशिक्षा – सायबरसुरक्षा’ या अभियानांतर्गत विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात टू-फॅक्टर ऑथेन्टिकेशन (Two-Factor Authentication) या महत्त्वपूर्ण सायबर सुरक्षा तंत्रज्ञानावरील मार्गदर्शनाने झाली. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोशल मीडिया खाती, ई-मेल आयडी तसेच बँक खात्यांची सुरक्षितता वाढविण्यासाठी या तंत्राचा उपयोग कसा होतो, याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
जनजागृती अधिक प्रभावी करण्यासाठी महाविद्यालयाच्या परिसरात ‘सायबर अवेअरनेस सेल्फी पॉईंट’ उभारण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी उत्साहाने येथे छायाचित्रे काढून सोशल मीडियावर शेअर केली, ज्यामुळे जागरूकतेचा संदेश व्यापक पसरला.
“अशाप्रकारचे सायबर सुरक्षा विषयक उपक्रम राबवल्याने भविष्यात उद्भवणारे संभाव्य धोके टाळता येतील. असे उपक्रम पुढेही राबविण्यात येतील,” असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.
हा उपक्रम क्विक हिल फाऊंडेशन, पुणे व गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी सुरक्षित इंटरनेट वापराची शपथ घेतली.
या कार्यक्रमाला प्राध्यापकवर्ग व महाविद्यालयीन कर्मचारी मिळून सुमारे ६०० जणांची उपस्थिती होती. उपक्रमाचे नियोजन समन्वयक प्रा. केतन जोगळेकर यांनी केले, तर २० सायबर वॉरियर्सनी या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.









