‘अमृत’चा २१ ऑगस्ट रोजी कोकणातील पहिला मेळावा रत्नागिरीत

रत्नागिरी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेच्या अमृत मेळावा येत्या २१ ऑगस्ट रोजी आयोजित केला आहे. अमृत संस्थेच्या वतीने समाजोन्नती, शैक्षणिक प्रगती व स्वावलंबनाच्या दिशने असा हा महामेळावा होणार आहे. कोकण विभागातील हा पहिला अमृत मेळावा रत्नागिरीतील टीआरपी येथील अंबर हॉल येथे सकाळी १० ते २ या वेळेत होणार आहे.

या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उद्योग, मराठी भाषा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, अध्यक्षस्थानी अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मेळाव्याच्या माध्यमातून अमृत लक्षित गट (ब्राह्मण, राजपुरोहित, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, जाट, सिंधी, कानबी, राजपूत, कोमटी, हिंदू मारवाडी) यांच्याकरिता विविध योजना (स्वयंरोजगार, शिक्षण विषयक, कर्ज व्याज परतावा, बेकरी, सोलर तसेच इम्पोर्ट एक्सपर्ट आदी प्रशिक्षणे) आयजीटीआर, सीआयपीईटी, एनआयईएलआयटी, सी- डॅक, एमकेसीएल आदी तांत्रिक व तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षणे) यासह विविध योजनांची माहिती रजिस्ट्रेशन व लाभ घेण्यासाठी लक्षित गटातील लोकांनी अमृत मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन अमृतचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक महेश गर्दे यांनी केले आहे.

या कार्यक्रमासाठी जिल्हा व्यवस्थापक महेश गर्दे, विभागीय उपव्यवस्थापक अमित सामंत, जिल्हा उपव्यवस्थापक संतोष जुवळे, जिल्हा समन्वयक अवधूत मुळ्ये मेहनत घेत आहेत. कोकण विभागातील अमृत लक्षित गटातील ब्राह्मण, मारवाडी, सिंधी, आर्य वैश्य, माहेश्वरी, कायस्थ, राजपुरोहित अशा विविध खुल्या प्रवर्गातील बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी अमृत- 91122 28761 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महेश गर्दे यांनी केले आहे.