रत्नागिरी :
कोकण रेल्वे प्रशासनाने तिकिटविना प्रवासाला आळा घालण्यासाठी तीव्र तिकीट तपासणी मोहिमा सुरू केल्या आहेत. या मोहिमेद्वारे प्रवाशांचा अधिकृत आणि सुरक्षित प्रवास सुरळीत व्हावा हा उद्देश आहे.
वित्तीय वर्ष २०२५-२६ पासून आतापर्यंत एकूण ३,७६५ तिकीट तपासणी मोहिमा घेण्यात आल्या असून, त्यामध्ये ४०,६०२ अनधिकृत / बेकायदेशीर प्रवासी सापडले. यांच्याकडून ₹२,३७,११,१६१ दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे की, सणासुदीच्या काळात अधिक तपासण्या केल्या जातील, ज्यामुळे अधिकृत प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व सुखकर होईल.












