वैभववाडीत अतिवृष्टी : अनेक काॅजवे पाण्याखाली
वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्याला दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले. झालेल्या मुसळधार पावसाने सडूरे दौंडोबा येथे दरड कोसळली. ही दरड एसटी बस त्याठिकाणी येता येताच कोसळली. शिराळे विजयदुर्ग ही वस्तीची एसटीची बस या दरडीतुन थोडक्यात बचावली आहे. ही घटना सोमवारी सकाळी ६. ३० वा.च्या सुमारास घडली.त्यामुळे सुमारे पाच तास वाहतूक बंद होती . दुपारी जेसिबीच्या साहाय्याने दरड हटवून वाहतूक सुरळीत सुरु करण्यात आली. अतिवृष्टीचा फटका अनेक गावांना बसला. अनेक काॅजवे पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहे.
तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाने वैभववाडी सडूरे शिराळे मार्गावर सडूरे येथे रस्त्यावर सकाळी मोठी दरड रस्त्यावर कोसळली. या दरम्यान त्याठिकाणी शिराळे येथून वस्तीची एस टी बस शिराळे विजयदुर्ग येत होती. एस. टी बस वर दरड कोसळण्यापासून थोडक्यात बचावली. अन्यथा मोठा अपघात घडला असता. माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेतली. मात्र दरडीचा मोठा भागाच रस्त्यावर आल्यामुळे पूर्णपणे मार्ग ठप्प झाला होता. एस टी चालकांनी एस टी बस सुरक्षित ठिकाणी मागे घेऊन उभी केली.त्यानंतर याबाबत बांधकाम विभागाला माहिती मिळताच नायब तहसीलदार दिलिप पाटील, मंडळाधिकारी ठाकूर, बांधकाम विभागाचे अभियंता श्री. बाबर, श्री.इंगवले यांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसिबी बोलावून दुपारी पावणे एकाच्या सुमारास पूर्णपणे दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यांनंतर या ठिकाणी अडकून पडलेली शिराळे विजयदुर्ग एस टी बस वैभववाडीच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. यावेळी गावचे सरपंच दीपक चव्हाण, उपसरपंच नवलराज काळे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत जाधव, सुनील राऊत, अशोक पाटील आदी उपस्थित होते.












