व्हीजीएफ योजनेअंतर्गत केंद्र सरकारची मान्यता : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब
खा. नारायण राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
मंत्री नितेश राणे यांनी मानले केंद्र आणि राज्य सरकारचे आभार
सिंधुदुर्ग । प्रतिनिधी : तांत्रिक अडचणींमुळे काही काळासाठी बंद असलेला चिपी विमानतळ आता कायमस्वरूपी सुरू होणार आहे. याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे. केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री श्री. नायडू यांच्यासोबत सतत संपर्क साधून नारायण राणे यांनी व्हीजीएफ (VGF) योजने अंतर्गत चिपी विमानतळ कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारची मान्यता मिळवली. यासंदर्भात केंद्र सरकारने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले होते, ज्यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झाले
असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिली.
दरम्यान, या निर्णयामुळे चिपी विमानतळाला आता व्हीजीएफ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सर्व सवलती आणि सुविधा उपलब्ध होतील. यामुळे कोकणवासीय, पर्यटक आणि चाकरमानी यांच्यासाठी प्रवासाची एक मोठी सोय उपलब्ध झाली आहे. या निर्णयाबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या या विमानतळाच्या पुनर्वापसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन आणि आर्थिक विकासाला पुन्हा चालना मिळणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.











