बायपास शस्त्रक्रियेसाठी ‘ऑन कॉल रक्तदाते’ संघटनेच्या नऊ रक्तदात्यांचा पुढाकार 

मुसळधार पावसाची तमा न बाळगता 

गोव्यात जाऊन केले रक्तदान 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सांगेली येथील समिधा संदीप सांगेलकर या महिला रुग्णावर होणाऱ्या बायपास शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी नऊ रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान केले.

मंगळवारी समिधा यांच्या बायपास शस्त्रक्रियेसाठी ‘बी पॉझिटिव्ह’ रक्तगटाच्या ८-९ रक्तदात्यांची गरज होती. ही माहिती मिळताच ‘युवा विकास प्रतिष्ठान सांगेली’ आणि ‘ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग’ या संस्थांच्या सदस्यांनी तत्काळ प्रतिसाद दिला.

पाऊस, वादळ असूनही या रक्तदात्यांनी गोवा मेडिकल कॉलेज (GMC) च्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. या उपक्रमात रक्तदान करणाऱ्यांमध्ये नितीन राऊळ, अभिजीत कविटकर, सत्यवान मेस्त्री, अमित मेस्त्री, सौ. उमा वराडकर, बबन कोचरेकर, यश कदम, मंगेश माणगावकर आणि पियुष सांगेलकर यांचा समावेश होता. याशिवाय निलेश नाईक, सुहास राऊळ, सुशांत राऊळ आणि नरेश राऊळ यांना राखीव ठेवण्यात आले होते. केरळचे असलेले आणि सध्या गोव्यात राहणारे एल्डोस साजू हे सुद्धा प्लेटलेट देण्यासाठी आले होते, परंतु प्लेटलेटचा साठा उपलब्ध असल्यामुळे त्यांनाही राखीव ठेवण्यात आले.

या रक्तदात्यांच्या कामगिरीचे ‘ऑन कॉल रक्तदाते’ संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी कौतुक केले आहे. त्यांनी सांगितले की, संस्थेशी संलग्न असलेल्या ‘युवा विकास प्रतिष्ठान’ च्या सदस्यांनी आणि संस्थेच्या इतर रक्तदात्यांनी वेळेवर रक्तदान करून गरज पूर्ण केली. ‘सावंतवाडीमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातही काही रक्तदात्यांनी या रुग्णासाठी रक्तदान केले. उमा वराडकर या आमच्या महिला सदस्यांनीही प्रसंगावधान राखून रक्तदान केले, ही विशेष कौतुकाची बाब आहे,’ असे ते म्हणाले.

या सर्व रक्तदात्यांचे त्यांनी आणि संस्थेच्या कार्यकारिणीने आभार मानले आहेत. या मानवतावादी उपक्रमामुळे समिधा यांच्या शस्त्रक्रियेत मोठा हातभार लागला आणि त्यांच्यासाठी आवश्यक रक्ताची गरज पूर्ण झाली.