साळशीच्या इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानचा ऐतिहासिक दसरोत्सव शाही थाटात

पारंपरिक सीमोल्लंघन सोहळ्यासाठी भाविकांची अलोट गर्दी

राजेंद्र साटम (शिरगाव) :
देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानचा दसरोत्सव बुधवारी शाही थाटात पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात सीमोल्लंघन सोहळा पार पडला. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चौऱ्याऐंशी खेड्यांचा अधिपती असलेल्या या देवस्थानच्या उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी लाभली.

दुपारी श्री पावणाई देवालयात ढोल-ताशे वाजवून इशारत करण्यात आली. यावेळी बारा-पाच मानकरी, ग्रामस्थ, देवसेवक व भक्तगण मंदिरात जमा झाल्यानंतर वस्त्राभूषणांनी सजविलेले देवतरंग (शिवकळा) बाहेर काढण्यात आले. त्यानंतर शिवकळेकडून सीमोल्लंघनाचा हुकूम घेण्यात आला.

ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, ‘हर हर महादेव’च्या घोषात देवतरंगांसोबत निशाणदार, भालदार, चोपदार, मशालदार, चौरवीदार, अबदागीर, घडशी, गोंधळी, देवाचे सेवेकरी, बारा-पाच मानकरी, ग्रामस्थ व असंख्य भक्तगण सीमोल्लंघनासाठी आपट्याच्या झाडाकडे रवाना झाले.

या मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या आपट्याच्या झाडाची ब्राह्मणाकरवी पूजा करण्यात आली. त्यानंतर आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्यात आली. सोने लुटण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती.
त्यानंतर देवता परतीच्या मार्गावर चौऱ्याऐंशीच्या चाळ्याला भेट देऊन श्री गांगेश्वर-विठुलाई देवीच्या भेटीस जाते, अशी परंपरा आहे. त्यानंतर श्री देव सिद्धेश्वर, श्री देवी पावणाई व श्री रवळनाथ देवालयाभोवती फेरी मारून देवतांची भेट घेण्यात येते. त्यानंतर देवता पापडीवर गेल्यावर भक्तगण देवाला सोने अर्पण करून कृपाशीर्वाद घेतात.

हा सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी तसेच देवदर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. देवीची ओटी भरण्यासाठी व देवदर्शनासाठी माहेरवाशिणीही आवर्जून उपस्थित होत्या. चाकरमान्यांची उपस्थितीही लक्षणीय होती. शिरगाव दशक्रोशीतील असंख्य भाविकांच्या अलोट गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता.